मार्च २०१७ मध्ये झालेल्या पांढरकवडा पंचायत समितीच्या निवडणुकीत आठ सदस्यांपैकी शिवसेनेचे पाच सदस्य निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक-एक सदस्यच निवडून आला होता. पाचही सदस्य शिवसेनेच्या तिकिटावर जरी निवडून आले असले तरी यातील बहुसंख्य सदस्य हे अण्णासाहेब पारवेकर यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे सभापतीपदी इंदुताई मिसेवार यांची वर्णी लागली. शिवसेनेचे बहुमत असल्यामुळे सभापती व उपसभापती दोघेही शिवसेनेचेच झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी सभापतीपद हे सर्व साधारण उमेदवारासाठी निघाले. परंतु असे असतानाही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे पंकज तोडसाम यांना सभापतीपद मिळालं. त्यामुळे शिवसेनेच्या इतर सदस्यांमधे धुसफूस सुरू झाली. आता पंचायत समितीचा कार्यकाल केवळ सात-आठ महिन्यांचाच शिल्लक राहिलेला असताना शिवसेनेच्या सभापतीवर एका भाजपच्या सदस्याला हाताशी धरून शिवसेनेच्या सदस्यांनीच अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे आहे. पांढरकवडा तालुक्यात सध्या विविध सहकारी संस्थांमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्याचे प्रकार सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभापतीवर आणलेल्या अविश्वास ठरावावर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्याच्या राजकारणात काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा एक गट तर भाजपचे अण्णासाहेब पारवेकर यांचा एक गट यामध्ये सतत राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पारवेकर गटाचे सभापती जान मोहम्मद जीवानी यांच्यावर मोघे गटाने काही असंतुष्ट सदस्यांना हाताशी धरून अविश्वास ठराव दाखल केला होता. हा अविश्वास ठराव पारितही झाला. त्यानंतर पारवेकर गटाने मोघे गटाचे समजले जाणारे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जितेंद्र सिंग कोंघारेकर यांचेवर अविश्वास ठराव दाखल करून तो पारित केला व मोघे गटाचा वचपा काढला. त्यानंतर आता पारवेकर गटातर्फे पंचायत समितीच्या सभापती व अविश्वास ठराव दाखल करण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या सभापतीवर आणला शिवसेनेच्याच सदस्यांनी अविश्वास ठराव : पांढरकवडात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:29 AM