यवतमाळ- जिल्ह्यात नाफेड मार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बारदाना उपलब्ध होत नसल्याने व चना साठवणुकीसाठी गोदाम नाही. प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आर्णी येथे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रैली काढली.
महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा असे आर्जव शेतकऱ्यांनी केले व प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले. ह्या सायकल रैलीद्वारे शेतकऱ्यांनी नाफेड च्या केंद्रावर धडक देत त्याठिकाणी सामूहिक मारोती स्तोत्र पठण केले.
नाफेड चना खरेदी करीत नसल्याने शेतकर्यांना हमीभाव मिळत नसून त्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडच्या केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्या अन्यथा शिवसेना अक्षय तृतीयेनंतर हिसका आंदोलन करेल असा ईशारा बाळासाहेब मुनगीनवार यांनी दिला.