यवतमाळ : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जनआशीर्वाद’ यात्रा बुधवार २८ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. या यात्रेनिमित्त नेर येथे शेतकऱ्यांशी भेट,स्वागत, यवतमाळ येथे ‘आदित्य संवाद’ व दारव्हा येथे शिवसेना विजय संकल्प मेळावा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात आदित्य ठाकरे शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
२८ ऑगस्टला अमरावती मार्गे सकाळी ११ वाजता नेर येथे जनआशीर्वाद यात्रेचे आगमन होणार आहे. याठिकाणी शिवसेनेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे परिसरातील शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. नेर येथून दुपारी १२.३० वाजता यात्रेचे यवतमाळ येथे आगमन होणार आहे. यावेळी निघणाऱ्या मोटरसायकल रॅलीद्वारे यात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. स्थानिक पोस्टल मैदानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आयोजित ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राहणार आहे.
यवतमाळ येथील कार्यक्रमानंतर जनआशीर्वाद यात्रा दारव्हाकडे प्रयाण करणार आहे. दारव्हा येथील शिवाजी स्टेडियममध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेने तर्फे ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेनेने केली आहे. यात्रेसोबत युवासेनेचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व शिवसेनेचे मंत्री,खासदार सोबत राहणार आहेत.या कार्यक्रमानंतर ही यात्रा वाशिम जिल्ह्याकडे प्रयाण करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर,राजेंद्र गायकवाड आणि पराग पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.