वणीत काही काळ तणाव : नगराध्यक्ष व शिवसैनिकांत ‘तू तू-मै मै’ वणी : शिवसेना व भारतीय जनता पार्टीची युती तुटल्यानंतर शिवसैनिकांनी वणीत मंगळवारी पदवीधर मतदार संघाच्या युतीच्या उमेदवाराच्या पोस्टरवरील शिवेसना नेत्यांच्या प्रतिमा व नाव काढून टाकले. या प्रकारामुळे काही काही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी भाजपाचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व शिवसैनिकांत शाब्दिक चकमक झाली. शिवसेना व भाजपाचा काडीमोड झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील भाषण शिवसैनिकांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्याचा उद्रेक आज वणीत दिसून आला. दुपारी २ वाजताच्या सुमारास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, वणी तालुका प्रमुख गणपत लेडांगे, शहर प्रमुख राजू तुराणकर, ललित लांजेवार, पंचायत समितीचे सभापती सुधाकर गोरे, तेजराज बोढे, अभय सोमलकर, अजय नागपुरे, बंटी ठाकूर आदी शिवसैनिक टिळक चौकात पोहचले. त्यानंतर पदवीधर मतदार संघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या पोस्टरवरील शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या प्रतिमा काढून टाकल्या. एवढेच नव्हे तर पोस्टरवर जेथे जेथे शिवसेनेचे नाव आहे. तेसुद्धा पुसून टाकले. दरम्यान, या घटनेची माहिती भाजपाचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना मिळताच, भाजपाच्या काही नगरसेवकांसमवेत तेही टिळक चौकात पोहचले. पोस्टर फाडून टाकण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल बोर्डे यांनी शिवसैनिकांना विचारला, तेव्हा आता युतीच नाही तर शिवसेना नेत्यांचे फोटो व त्यांच्या नावाची पोस्टरवर गरजच काय, असा प्रतिप्रश्न गणपत लेडांगे यांनी उपस्थित केला. यावरून दोनही गटांत चांगलीच खडाजंगी झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून तात्काळ पोलीस कुमकही घटनास्थळी दाखल झाली. १० मिनिटानंतर हा वाद मिटल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या प्रकरणी कुणीही पोलिसांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे प्रकरणावर पडदा पडला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपा पक्षातील हा ताणतणाव प्रचारादरम्यानही दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीच्या काळात एकत्र नांदणाऱ्या या दोन राजकीय पक्षातील हा तणाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) पोस्टर फाडण्याचा शिवसैनिकांना अधिकार नाही. त्यांनी पोस्टर काढून टाकायलादेखील सांगितले नाही. अचानक येऊन पोस्टर फाडणे हे संयुक्तिक नाही. - तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष, भाजपा आता शिवसेना-भाजपाची युतीच नाही, तर पोस्टरवर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो व नावाची गरजच काय? त्यामुळे आम्ही पोस्टरवरील प्रतिमा व नावे काढून टाकली. - गणपत लेडांगे, तालुका प्रमुख शिवसेना, वणी.
शिवसैनिकांचा ‘पोस्टर फाड’ राडा
By admin | Published: February 01, 2017 1:45 AM