यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींपैकी चक्क चार नगरपंचायतींचे अध्यक्षपद शिवसेनेने पटकाविले आहे. तर सर्वाधिक सदस्य जिंकलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन नगराध्यक्षपद आले आहे. विशेष म्हणजे, दोन ठिकाणी महाविकास आघाडीमधील शिवसेनेने भाजपसोबत युती करून नगराध्यक्षपद पटकाविले आहे.
राळेगाव नगरपंचायतीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. तेथे नगराध्यक्षपदी काँग्रेसचे रवींद्र शेषराव शेराम यांची बिनविरोध निवड झाली. बाभूळगाव येथे काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या काँग्रेस उमेदवार सिद्दिकी अफरोज बेगम फारूक अहमद यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. बाभूळगाव येथे शिवसेना-काँग्रेस युतीच्या शिवसेना उमेदवार संगीता मालखुरे यांचीही बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली. झरी येथे शिवसेना आणि जंगोम दलाच्यातर्फे शिवसेनेच्या ज्योती संजय बिजगुनवार नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या. महागाव आणि मारेगाव येथे शिवसेनेने भाजपसोबत युती करीत महाविकास आघाडीला धक्का दिला. महागावच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या करुणा नारायणराव शिरबिरे विजयी झाल्या. तर मारेगाव येथेही शिवसेनेचे मनिष तुळशीराम मस्की नगराध्यक्षपदी विजयी झाले.
दोन पालिकात काँग्रेसला धक्का
महागाव आणि मारेगाव येथे महाविकास आघाडीला तडा बसला आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने भाजपसोबत युती करून नगराध्यक्षपद पटकाविले. या दोन्ही ठिकाणी भाजपला उपाध्यक्षपद मिळणार आहे. मात्र, बाभूळगाव आणि कळंबमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. झरी येथे काँग्रेसला बाजुला सारत शिवसेनेने जंगोम दलाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सहा पैकी चार ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष तर दोन ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले आहे. या निवडणूक निकालाचा पुढील निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.