यवतमाळ न्यायालय : वीज अभियंत्याला मारहाणीचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विद्यमान जिल्हा संघटिका लता श्याम चंदेल (३१) रा. तंखाबे ले-आऊट यांना जिल्हा न्यायालयाने मंगळवारी दोन महिने सश्रम करावासाची शिक्षा ठोठाविली. भारनियमनासंदर्भातील एका आंदोलनादरम्यान त्यांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. १३ डिसेंबर २०१३ रोजी उपकार्यकारी अभियंता, शहर उपविभाग यवतमाळ यांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्ते व नगरसेवक भारनियमनावर चर्चा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी लता चंदेलही उपस्थित होत्या. या ठिकाणी महावितरणचे कार्यकारी अभियंता पंकज तगडपल्लीवार व उप अभियंता प्रमोद सस्ते हजर असताना उपस्थित महिलांनी सह अभियंता श्रीराम साठे (५४) रा. आनंदनगर, यवतमाळ यांना बोलाविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे साठे हे त्या ठिकाणी आले असता भोसा परिसरातील भारनियमानाला तुम्हीच जबाबदार आहात, असा आरोप करून आरोपी लता चंदेल यांनी पायातील चप्पल काढून साठे यांना मारहाण केली होती. या प्रकरणी साठे यांनी वडगाव रोड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक भारती गुरनुले यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सहा साक्षी नोंदविण्यात आल्या. गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम श्रेणी न्यायाधीश यांनी दोन महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता चंद्रकांत बी. उके यांनी बाजू मांडली.
शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्याला सश्रम कारावास
By admin | Published: May 10, 2017 12:18 AM