गतवर्षी कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सर्व कामकाज बंद पडल्याने मजूर तसेच गरिबांच्या जेवणाचे वांदे झाले होते. त्यामुळे गरजूंची भोजनाची व्यवस्था करण्याकरिता राज्य शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती. रूग्ण संख्येत घट झाल्यानंतर योजना बंद पडली. परंतु सध्या रूग्ण वाढल्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले. तसेच जमावबंदी संचारबंदी लागू करण्यात आली.
संचारबंदीचा छोट्या व्यवसायासह काही कामकाजावर परिणाम झाला. याचा विचार करता पुन्हा शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे. शहरातील शिवभोजन केंद्रावर दररोज दीडशे ते दोनशे गरजू नागरिक मोफत थाळीचा लाभ घेत आहे. पार्सल सुविधाही उपलब्ध असल्याचे केंद्राचे संचालक प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले. गरजूंकरिता चांगली सुविधा निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.