महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 08:40 PM2021-02-05T20:40:23+5:302021-02-05T23:17:51+5:30
मंत्रीपदापासून तर प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष पदापर्यंत सर्वच पदांवर विदर्भातील नेत्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
यवतमाळ : विदर्भातील ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेस विदर्भात आपली पाळंमूळ मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. मंत्रीपदापासून तर प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष पदापर्यंत सर्वच पदांवर विदर्भातील नेत्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणून आक्रमक चेहरा असलेले नाना पटोले यांची निवड झाली, त्यापाठोपाठ विदर्भातील जुन्या जाणकार व ज्येष्ठांच्या फळीत असलेले ॲड. शिवाजीराव मोघे यांना कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली. शिवाजीराव मोघे हे १९८० ते १९९९ या काळात काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी परिवहनमंत्री, सामाजिक न्यायमंत्री म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ते परिचित आहेत. याच कारणाने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास टाकत कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.