लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सोळाही तालुक्यांमध्ये शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले. यवतमाळ येथे शिवतीर्थावर सकाळी ८ वाजतापासून शिवरायांच्या पुतळ्यापुढे अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांची रीघ लागली होती. असाच उत्साह पुसदच्या शिवाजी चौकात पाहायला मिळाला. दिग्रस, पांढरकवडा, महागाव, नेर, घाटंजी, आर्णी, बाभूळगाव, वणी अशा सर्वच तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा, व्याख्यान व अन्य कार्यक्रमांचे आयोजन धूमधडाक्यात पार पडले. अभिवादन कार्यक्रमानंतर काही ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी कोरोनाचे नियम पाळत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वत्र भगव्या पताकांनी लक्ष वेधून घेतले. फेटे परिधान केलेले युवक, लुगडे परिधान केलेल्या युवतींनी दुचाकी रॅलीत सहभाग घेतला. शेंबाळपिंपरीसारख्या गावात पायदळवारी काढण्यात आली. यवतमाळच्या शिवतीर्थावर दिवसभर रक्तदान शिबिर आणि कोविड लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. यात युवकांनी उत्साहाने रक्तदान केले. शिवतीर्थ परिसरात शिवरायांची प्रतिमा, मूर्ती व विविध साहित्याच्या दुकानांनी लक्ष वेधले. सायंकाळच्या सुमारास शिवभक्तांनी भगव्या पताका उडवून जल्लोष साजरा केला. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी वातावरणात वेगळाच उत्साह संचारला होता.
शिवजयंती घराघरांत, शिवराय मनामनांत - सार्वजनिक शिवजयंतीसोबतच यंदा ‘शिवजयंती घराघरांत’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये हजारो नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. आपल्या घरी शिवरायांच्या जीवनातील एखाद्या प्रसंगाचा देखावा साकारून नागरिक या उपक्रमात सहभागी झाले. यवतमाळसह पुसद, वणी, दिग्रस, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी आदी तालुक्यांमध्येही हा उपक्रम राबविला गेला. त्यासोबतच वाॅर्ड तेथे शिवजयंती हा उपक्रमही राबविला गेला.