नेर तालुका : शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना मिळाली संजीवनी नेर : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने नेर तालुक्यात एकतर्फी विजय संपादन केला. भाजपा , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फज्जा उडाल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना संजिवनी मिळाली आहे. एकेकाळी लोकांच्या पसंतीस उतरलेले राजकीय पक्ष आता सहकार क्षेत्रातही माघारले आहेत. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, पालकमंत्री मदन येरावार, माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी प्रचारात सक्रिय भाग घेऊनही फायदा होऊ शकला नाही. त्यामुळे या पक्षांवर आत्मचिंतनाची वेळ आली. तालुक्यातील तिनही जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेने विजय मिळविला. या निवडणुकीत पंचायत समितीवरही शिवसेनेने पाच सदस्य निवडून आणून विजयाची हॅट्रीक साधली आहे. शिवसेना नेते बाबू पाटील जैत व रविकिरण राठोड यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले होते. मागील निवडणुकीत राहुल ठाकरे यांनी वटफळी गटात बाबू पाटील जैत यांना पराभूत केले होते. तर मांगलादेवी गटात रविकिरण राठोड यांचा केवळ तीन मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शिवसेनेने पुन्हा बाबू पाटील जैत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचे सुपूत्र निखील जैत यांना वटफळी गटातून तिकीट दिले. तर मांगलादेवी गटात रविकिरण राठोड यांच्या अर्धांगिणीला उमेदवारी दिली. हे दोन्ही उमेदवार निवडून आणत शिवसेनेने आम्ही अजूनही वाघच आहोत हे दाखवून दिले. या जागा पडल्या असत्या तर तयांच्यावर टीकेची झोड उठविली गेली असती. नेर तालुक्यातील मालखेड बु. हा तिसरा आणि महत्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. येथे अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत राजकीय वारसा नसलेली मावळते पंचायत समिती सभापती भरत मसराम यांनी काँग्रेसच्या हेमंत कोटनाके यांचा पराभव केला. पंचायत समिती जिंकल्यानंतर मसराम यांना जिल्हा परिषदेतही जिंकण्याची संधी मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेलाही अतोनात मेहनत घ्यावी लागली. शिवसेनेच्याच गटातटाने शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अस्तित्वाच्या लढाईत गटतट कोलमडले व शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता आली. भाजपाने रिपाई (आ.) गटाला सोबत घेतले. रिपाई गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी आपली सहचारिणी सुलोचनातार्इंना वटफळी गटात रणांगणात उतरविले. मात्र भोयर यांनी बोधचिन्हावर निवडणूक न लढण्याचा घेतलेला निर्णय त्यांना चौथ्या क्रमांकावर घेऊन गेला. एकवेळी शिवसेनेसोबत घट्ट असलेले भोयर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर गेले. यानंतर त्यांनी माणिकराव ठाकरेंशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रसजनांनी ही सलगी अमान्य केली. यामुळेच त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. सक्रिय राजकारणात तालुक्यात नवख्या असलेल्या भाजपासोबत मैत्री करणे भोयर यांना नडले की भाजपाची गोची झाली, यावर सध्य मंथन सुरू आहे. वटफळी गणात बसपाने मारलेली मतांची भरारी शिवसेनेसाठी पोषक ठरली. काँग्रेसचा पराजय बसपाने सोपा केला. वटफळी गणात काँग्रेसने एका चांगल्या व्यक्तिमत्वाला तिकीट दिले, मात्र खुद्द ठाकरे परिवाराने केलेला प्रचारही काँग्रेसचा पराजय टाळू शकला नाही. काँग्रेसचे पुढारी केवळ निवडणुकीच्यावेळी दिसतात इतर वेळी त्यांचे कार्यकर्तेही ढिम्म असतात, हे निकालावरून स्पष्ट होते. काँग्रेसचे गड ३००, ४००, ६०० मतांनी कोसळले. त्यामुळे शिवसेनेपुढे काँग्रेसची ताकद अपुरी पडल्याचे स्पष्ट झाले. (तालुका प्रतिनिधी)
शिवसेनेने उडविला भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीचा फज्जा
By admin | Published: February 27, 2017 12:52 AM