यवतमाळ : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच शांत झाली. शिवसेनेने आपला गड सर केला. आता प्रचार साहित्याकडे दुर्लक्ष होत आहे. भगवा शेला, बिल्ला, हॅन्ड बेल्ट हे शिवसैनिक मोठ्या अभिमानाने स्वत: परिधान करतो व कायम त्याचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करतो. मात्र, काही बाजारु घटकांचा संघटनेत समावेश झाला की त्याला संघटनेच्या प्रतिकाशी आत्मियता राहत नाही. याच कारणाने यवतमाळातील आठवडी बाजारात चक्क शिवसेनेचा धनुष्यबाणच भंगारात विक्रीला आल्याचे चित्र रविवारी सकाळी पहावयास मिळाले.
शिवसेना ही आक्रमक व संवेदनशील संघटना म्हणून ओळखली जाते. बाळासाहेबांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हा गावागावातच नव्हे तर अनेक तरुणांच्या मनात बिंबविला. गावपातळीवर शिवसैनिक म्हणून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी आजही धडपडत असते. कुठलाही वारसा अथवा आर्थिक सुबत्ता नसतानाही केवळ भगवा शेला, धनुष्यबाण असलेला बिल्ला किंवा हॅन्ड बेल्ट घालून तो अन्यायाविरुद्ध उभा ठाकतो. सामाजिक क्षेत्रात काम करताना शिवसैनिक हीच त्याची ओळख महत्वाची मानली जाते. त्यामुळेच अनेक कार्यकर्ते शिवसेनेचा धनुष्यबाण असलेले बिल्ले, हॅन्ड बेल्ट जीवापाड जपतातही. असे असले तरी संघटनेत निष्ठावानांसोबत संधीसाधूंची संख्या अधिक झाल्याने संघटनेसोबत पडताळणा होते. अशातूनच लोकसभेच्या निवडणुकीत घराघरात पोहोचविण्यासाठी दिलेले प्रचार साहित्य कुणी तरी दडवून ठेवले. आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सावकाश हे प्रचार साहित्य थेट भंगारात विक्रीला काढले आहे.
यवतमाळात रविवारी आठवडी बाजार भरतो. येथे प्रवेशद्वाराजवळच भंगाराची दुकाने लागतात. केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे बिल्ले, हॅन्ड बेल्ट एका भंगाराच्या दुकानात मोठ्या संख्येने विक्रीला ठेवण्यात आले होते. गावखेड्यातून बाजारात खरेदीसाठी आलेल्या प्रत्येकाचे या भंगारातील धनुष्यबाणाकडे लक्ष जात होते. हे बिल्ले, हॅन्ड बेल्ट नेमके आले कोठून याबाबत दुकानदाराकडे विचारणा केली असता कुण्यातरी कबाडीने हा माल शहरातून गोळा केला व आमच्याकडे आला. भंगारात आलेली कोणतीही वस्तू कमी दरात विकणे हा आमचा व्यवसाय आहे. हे बिल्ले व हॅन्ड बेल्ट कुणी दिले याबाबत त्या व्यावसायिकाने बोलण्याचे टाळले.