- अविनाश साबापुरे
यवतमाळ : गेल्या पाचशे वर्षात जगभरातील पक्ष्यांच्या १६१ प्रजाती नष्ट झाल्या. पक्ष्यांच्या अधिवासांना झपाट्याने धोके वाढत असल्यामुळे आगामी शंभर वर्षात पाखरांच्या तब्बल १२०० प्रजाती संपुष्टात येतील, असा गंभीर धोका मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी यांनी आपल्या संशोधनातून वर्तविला आहे.पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रमजान विराणी अनेक वर्षांपासून पक्षी प्रजातींचा अभ्यास करीत आहेत. सध्या महाराष्ट्रात पक्षी सप्ताह साजरा होत असताना त्यांनी संशोधन अहवाल पुढे आणला. त्यात ‘वर्ल्ड वॉच’ संस्थेच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी म्हटले की, इसवी सन १५०० पासून पाच शतकात जगातील १६१ पक्षी प्रजाती नष्ट झाल्या. पुढील शतकात १२०० पक्षी प्रजाती नामशेष होतील.जगभरात पक्ष्यांच्या १८०० प्रजातींची नोंद आहे. त्यातील १३७५ प्रजाती भारतात आढळतात. विदर्भात ४१० आणि यवतमाळ जिल्ह्यात २३० पक्ष्यांच्या प्रजाती असल्याचेही डॉ. विराणी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जंगलातील अतिक्रमण, अवैध चराई, वणवा, शेतात कीटकनाशकांचा अतिरेकी वापर अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचे अधिवास व अस्तित्व धोक्यात येत आहेत.
पक्ष्यांना धोका निर्माण केल्यास ६ महिने तुरुंगवास पक्ष्यांसह प्राणी व वनस्पतींच्या संरक्षणासाठी १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम लागू करण्यात आला. त्यानुसार पक्ष्यांच्या अधिवासांना इजा पोहोचविणाऱ्या व्यक्तीस ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. जलस्रोत व हंगामी पाणथळ क्षेत्राचे व्यवस्थापन पाटबंधारे विभागाकडे असते. तेथील पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन विभाग व मत्स्य विभागालाही जबाबदारी दिली जावी, अशी मागणी डॉ. विराणी यांनी केली आहे.
रानपिंगळा राज्य पक्ष्याच्या शर्यतीतराज्याचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून ओळख असलेल्या ‘हरियाल’ (हिरवे कबुतर) पक्ष्याचे दर्शन दुर्मीळ झाल्याने मेळघाटचे वैभव ठरलेला रानपिंगळा राज्य पक्ष्याच्या शर्यतीत उतरला आहे. राज्यातील पक्षिप्रेमी, पक्षी अभ्यासकांसह मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीने यास महाराष्ट्राचा राज्यपक्षी करावा, अशी शिफारस यापूर्वीच केली आहे.