लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: पुण्यावरून परत आल्यानंतर गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका २३ वर्षीय युवकाने गावालगतच्या पाझर तलावाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रामू विठू आत्राम असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. रामू आत्राम हा हनुमान अय्याजी आत्राम व सुरेश अरूण आत्राम या दोन मित्रासमवेत ११ मे रोजी पुणे येथून गोंबुरांडा येथे परत आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने या तिघांनाही बुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करून ठेवले होते. त्यानंतर कोरोनाच्या भयाने या तिघांना गावातील कुणी भेटतही नव्हते. केवळ घरून त्यांना जेवणाचे डबे पुरविले जात होते. या सर्व प्रकाराने रामू आत्राम याच्या मनावर विपरित परिणाम झाला. नैराश्येतून १३ मे रोजी तो शाळेतून पळून गेला. या प्रकारानंतरही गावातील पोलीस पाटील, सरपंच यांनी साधी दखलही घेतली नाही. दरम्यान शनिवारी सकाळी ८ वाजता गावातील एका गुराख्याला गावालगतच्या पाझर तलावाजवळ रामूचा मृतदेह पळसाच्या एका झाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत रामू आत्राम याच्या मागे आई, दोन लहान भाऊ असा परिवार आहे. तो पुणे जिल्ह्यातील वेळू येथील पेट्रोलच्या टाक्या तयार करणाऱ्या कारखान्यात कामाला होता. वडिल नसल्याने संपूर्ण कुटूंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्यावर होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाइन केलेल्या युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:29 AM