प्रकाश सातघरे
दिग्रस (यवतमाळ) : नव्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगरपालिकेची सूत्रे स्वीकारली. पहिल्याच दिवशी त्यांनी दांडीबहाद्दर आठ कर्मचाऱ्यांना शोकाॅज नोटीस बजावून कामकाजाला सुरुवात केली. नागरिकांच्या सहकार्याने दिग्रस शहराचा कायापालट करून स्वच्छ व सुंदर शहर बनविणार असल्याचे मुख्याधिकारी मडावी यांनी सांगितले.
नव्या मुख्याधिकाऱ्यांनी दाखल होताच आठ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याने कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी परवानगीविना रजेवर गेलेल्या आठ कर्मचाऱ्यांना मडावी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. यवतमाळ नगरपालिकेत मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून कार्यरत असताना माधुरी मडावी यांनी आपल्या कार्याची छाप उमटविली होती. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच त्या जिल्ह्यात परिचित झाल्या होत्या. मडावी यांनी यवतमाळ नगरपालिकेत मुख्याधिकारी असताना अनेक धाडसी निर्णय घेतले. स्वच्छता, अतिक्रमण, नागरिकांच्या तक्रारी, आदी प्रमुख विषयांना प्राधान्य दिले.
नागपूर, अकोला, यवतमाळ येथे कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली होती. दरम्यान, शासनाने त्यांची दिग्रस मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी दिग्रस नगरपालिकेत मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. शहराचा विकास साधायचा असेल तर सुरुवात कार्यालयापासून करावी लागते. कार्यालयात स्वच्छतेचा अभाव, वॉशरूम व इतर ठिकाणचे खिळखिळे दरवाजे आणि विनापरवानगीने आठ कर्मचारी रजेवर गेल्याची बाब मुख्याधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतली. यावेळी रजेवरील आठ कर्मचाऱ्यांना शोकॉज बजावल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. दिग्रस शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दिग्रस शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले.
१५ वर्षांत १७ ठिकाणी बदलीआपल्या १५ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीत ही १७ वी बदली असल्याचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले. शहर सुंदर आणि स्वच्छ करायचे असेल, शहराचा कायापालट करायचा असेल तर नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले.