लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : एका महिन्यापासून घराबाहेर असलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलिसांच्या साक्षीने शुभमंगल करून देण्यात आले. यासाठी येथील भीम टायगर सेनेने पुढाकार घेतला.तालुक्यातील लोणी येथील विश्वास आत्माराम गायकवाड (२0) आणि प्रियंका पंजाब मनवर (२0) रा.मोहा (ई) यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाच्या आणा-भाका घेतल्या. कुटुंबीय या प्रेमसंबंधाला मान्यता देणार नाही, असे लक्षात आल्यावरून ते नातेवाईकांच्या दूर राहू लागले. मात्र कायद्यानुसार ते लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकत होते. त्यामुळे दोघांनीही नातेवाईकांना माहिती कळवून लग्न करणार असल्याचे सांगितले. नंतर ते येथील शहर पोलीस ठाण्यात आले. अखेर दोन्ही पक्षांच्या नातेवाईकांना ठाणेदार प्रमेश आत्राम व भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी रविवार, २१ एप्रिलला पोलीस ठाण्यात पाचारण केले. दोघेही सज्ञान असल्याने दोन्ही कुटुंबांनी त्यांचे लग्न लावण्यास सहमती दिली. त्यानुसार सोमवार, २२ एप्रिल रोजी दोन्हीकडील मंडळी पुन्हा पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर विश्वास व प्रियंकाचे लग्न लावण्यात आले.यावेळी ठाणेदार प्रमेश आत्राम, समाधान मोतीराम जाधव, किशोर कांबळे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, बाबाराव उबाळे, दत्तराव कांबळे, प्रभाकर खंदारे, आकाश सावळे, अण्णा दोडके आदींनी वर-वधूंना आशीर्वाद दिले. जमादार रमेश जाधव यांच्यासह पोलीस आणि भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
पोलिसांच्या साक्षीने झाले शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 9:46 PM
एका महिन्यापासून घराबाहेर असलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलिसांच्या साक्षीने शुभमंगल करून देण्यात आले. यासाठी येथील भीम टायगर सेनेने पुढाकार घेतला.
ठळक मुद्देपुसदमध्ये विवाह : भीम टायगर सेनेचा पुढाकार