पांढरकवडा आगाराची उदासीनता : तालुक्यातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान, अन्य प्रवाशांसाठी बसेसचा वापर लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : तालुक्यातील शाळा-महाविद्यालय सुरू होऊन आठवडा उलटून गेला. परंतु खेड्यापाड्यातील मुलींना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी दरवर्षी नियमितपणे सोडण्यात येणाऱ्या मानव मिशनच्या बसेस अद्यापही पांढरकवडा आगारातून सोडण्यात आल्या नाही. यामुळे विद्यार्थिनींचे शैैक्षणिकनुकसान होत आहे. ग्रामीण भागातून तालुकास्थळी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी शासनाने मानव मिशनच्या माध्यमातून प्रत्येक आगारात बसेस उपलब्ध करून दिल्या. या गाड्या केवळ पासधारक विद्यार्थिनींसाठी असून या गाड्या दुसऱ्या कोणत्याही मार्गावर धावणार नाही. तसेच विद्यार्थिनींशिवाय कोणतेही प्रवासी या बसमध्ये घेऊ नये, असा शासनाचा दंडक आहे. जिल्ह्याच्या बाहेरही या गाड्या पाठवू नये, असे शासनाचे आदेश आहे. परंतु या गाड्या सर्रासपणे दुसऱ्या मार्गावर प्रवासी भरून जाताना दिसतात. त्यामुळे शासनाने ज्या उद्देशाने या गाड्याएस.टी.आगाराला पुरविल्या, त्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. आगारात मानव मिशनच्या नऊ गाड्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा गेल्या २७ जूनपासून सुरु झाल्या. शाळा सुरू होऊन १० दिवस उलटून गेले. परंतु अजुनही विद्यार्थिनींसाठी असलेल्या या मानव मिशनच्या गाड्या अद्यापही शेड्युलप्रमाणे सोडल्या नाही. खेड्यापाड्यातील मुली व त्यांचे पालक दररोज पांढरकवडा एस.टी. आगारात येऊन गाड्या सुरु करा म्हणून विनवणी करीत आहे. परंतु त्यांचे कोणीही ऐकायला तयार नाही. कोणतीही कारणे सांगून त्यांना परत पाठविले जाते. एस.टी.च्या एका कर्मचाऱ्याने तर या गाड्या चक्क पंढरपुरला गेल्या असून या गाड्या परत आल्यानंतर दररोज नियमितपणे सोडण्यात येईल, असे सांगून टाकले. पांढरकवडा ते पिंपळखुटी, पांढरकवडा ते करणवाडी, पांढरकवडा ते पाटण एदलापूर(धानोरा) या शिवाय वाई मार्गावर या मानव मिशनच्या गाड्या सुरु होत्या. या मार्गावरील ढोकी, सुन्ना, कोपा मांडवी तसेच सोनबर्डी, मारेगाव, वाघोली, तांडा, करणवाडी याशिवाय मार्गातील अनेक गावातील मुली या गाड्यांनी मोफत पासव्दारे जाणे येणे करीत होत्या. परंतु या सत्रात या गाड्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी अद्यापही सुरु केल्या नाही. त्यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गाड्या केवळ शाळेतील विद्यार्थिनींसाठीच असुनसुध्दा सर्रास नागपुर, अमरावती या मार्गावर प्रवासी भरुन पाठविल्या जात आहे.
शाळा सुरू होऊनही मानव मिशनच्या बसेस बंदच
By admin | Published: July 09, 2017 12:54 AM