उमरखेड : येथील संजय गांधी चौकामधील सिग्नल बंद आहे. वाहनधारकांना अपघातापासून वाचविणे हे, सिग्नलचे काम आहे. खांबाला काही दिवसांपूर्वी कंटेनरने धडक दिल्याने खांब खिळखिळा झाला आहे. आता या खांबामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
शहरातील मुख्य चौक असलेल्या संजय गांधी चौकात अनेक वर्षांपासून सिग्नल लावण्याची मागणी होती. दोन वर्षांपूर्वी भारती मैंद सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने सिग्नल लागले. मात्र, सहा-आठ महिन्यातच सिग्नल बंद पडले. काही दिवसांपूर्वी कंटेनरने सिग्नलच्या खांबाला धडक दिली. परिणामी खांब बुडातून खिळखिळा होऊन रस्त्याच्या बाजूला झुकला. हा खांब कधीही पडूून अपघात होण्याची शक्यता आहे.
याबाबत काही संघटनांनी वाहतूक शाखेला अनेकदा कळविले. परंतु वाहतूक शाखेने अद्याप कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे वाहतूक शाखा एखाद्या अपघाताची वाट पाहते आहे की काय, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहे. वाहतूक शाखेने अपघातास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या सिग्नलच्या खांबाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.