लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.तालुक्यातील सावंगा बु. येथे ईश्वर देशमुख सैनिकी शाळेत डॉ.रमाकांत कोलते व कार्यवाह प्रा.घनश्याम दरणे यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी डॉ.कोलते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. तर प्रमुख अतिथी डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात करणारे डॉ.कोलते पुढे अमोलकचंद महाविद्यालय येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रचंड अडथळे येऊनही विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्यामुळे व विश्वासामुळे सदर संमेलन यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. तर प्रा.घनश्याम दरणे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकावा, असे आवाहन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा असल्याशिवाय भावनिक परिवर्तन शक्य नसल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नितीन धनवंत यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष भोकरे तर टाकेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्र प्रमुख किरण बारसे, संतोष झाडे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुजाण नागरिक हीच शिक्षकाची सार्थकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:10 PM
शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.
ठळक मुद्देरमाकांत कोलते : दिग्रस तालुक्यात अ.भा. साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांचा सन्मान