पुसद : पुसद परिसरातील उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी यंदाचा गळीत हंगाम धोक्यात येण्याची भीती कारखानदारांना आहे. यावर्षी ऊस मिळविण्यासाठी त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला ऊस गाळपाऐवजी जाळावा लागला, तर अनेकांनी तोडून धुऱ्यावर टाकला. यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. यंदा ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्यांना मात्र सोन्याचे दिवस आले आहेत. परिसरातील अशा शेतकऱ्यांनी आपला ऊस कार्यक्षेत्राबाहेरील कारखानदारांना रोख स्वरूपात विकण्याचा निश्चय केला आहे. तर काही शेतकऱ्यांनी साखरेपेक्षा गुळाला अधिक भाव आहे म्हणून गुऱ्हाळ चालकांकडून दीपावलीच्या सणात अग्रीमची उचल केली आहे. दिवाळी झाली, अद्याप कारखानदारांचा गळीत हंगाम सुरू झाला नाही. डिसेंबर महिन्यात गाळप होणार, असे सांगितले जात असले तरी कारखाने प्रत्यक्ष कधी सुरू होणार, या विषयी अनिश्चितता आहे. उसाचे क्षेत्र वाढावे म्हणून साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना अनेक आमिषे दिली. परंतु वीज आणि पाण्याअभावी उसाचे क्षेत्र म्हणावे तसे वाढले आहे. यामुळे यंदाचा हंगाम कमी कालावधीचाच राहणार, अशी आजची परिस्थिती आहे. दरवर्षी ऊसतोड कामगार दिवाळीच्या सणाला ऊस तोडण्यासाठी कारखान्यावर जातात. परंतु यंदा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू व्हायचा आहे. त्यामुळे यंदा मात्र ऊस तोड कामगारांच्या टोळ्या गावाकडे अजूनही फिरकल्या नाही. कारखान्याच्या चिमण्याही पेटल्या नाही. पुढे कारखाना सुरू ठेवण्यासाठी ऊस आणायचा कुठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र कमी असल्याने कामगारांपुढेही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
उसाचे गाळप घटण्याची चिन्हे
By admin | Published: November 20, 2015 2:58 AM