यवतमाळ : पोटाला पीळ देऊन गोळा केलेला पैसा घोटाळेबाजांनी खाल्ला. डाक विभाग आणि पोलीस यंत्रणेला मात्र याविषयी काहीही गांभीर्य नाही. प्रमुख घोटाळेबाज फरार आहे. तर त्याला साथ देणारे बिनधास्त आहे. चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही पोलिसांत गुन्हा दाखल होण्यावरच कोठा वेणी (ता. कळंब) पोस्टमास्तरने केलेल्या घोटाळ्याचा तपास थांबला आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा दडपला तर जाणार नाही ना, अशी चिन्हे दिसू लागली आहे.
कोठा डाकघराचा पोस्टमास्तर गौरव दरणे याने सुमारे २५ लाख रुपये हडपल्याचे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. याशिवाय ५० हून अधिक नागरिकांनी वैयक्तिकरीत्या पोलिसांत तक्रारी नोंदविल्या आहे. याप्रकरणी कळंब पोलिसांनी तक्रारदारांचे बयाण नोंदवून घोटाळेबाज गौरव दरणे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याला पकडण्यासाठी काही दिवसपर्यंत प्रयत्न झाले. अमरावती, वर्धा आदी ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. आता मात्र हे प्रकरण थंडावले असल्याचे दिसून येते.
गौरव दरणे याची डाकघर स्तरावर चौकशी सुरू असताना त्याने या विभागातील काही लोकांची नावे सांगितली. त्या लोकांना आपण 'हातभार' लावल्याचे तो सांगत होता. या डाक विभागातील जबाबदार व्यक्ती आहे. डाकघराच्या पैशांच्या व्यवहाराची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गौरवने या लोकांची धडधडीत नावे घेतलेली असताना विभागस्तरावर त्यांच्यावर कारवाई का केली नाही, याविषयी साधार शंका व्यक्त केली जात आहे.
शाखा डाकघराची तपासणी करण्यासाठी मुख्य डाकघरातील कर्मचारी आलिशान वाहनाने प्रवास करत होते. वास्तविक त्यांना केवळ एसटीचे प्रवासभाडे दिले जाते. गौरवने नावे घेतलेल्या काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची चर्चा खुद्द डाक विभागात आहे. तथापि आजही हे कर्मचारी उजळ माथ्याने फिरत आहे. एका कर्मचाऱ्याची बदली करून मुख्य डाकघर विभाग मोकळा झाला आहे. परंतु इतरांवर कारवाई करण्याचे धाडस का दाखविले जात नाही, हा प्रश्न आहे. गौरव पोलिसांच्या ताब्यात सापडेल तेव्हा सापडेल, तोपर्यंत डाक विभागांतर्गत चौकशी थांबून राहणार काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शाखा डाक विभागाची चौकशी नियमितपणे केली जाते. यात चौकशी करणाऱ्यांना काहीच संशयास्पद बाबी का आढळल्या नसाव्या, हाही एक संशोधनाचा विषय आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण गुंतलेले आहेत. याचा तपास झाल्याशिवाय नागरिकांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळणे कठीण आहे.