किशोर वंजारीलोकमत न्यूज नेटवर्क नेर : दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांच्या सभोवताल कॉप्या पुरविणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. भिंतीवर चढून, खिडकीमधून काॅप्या पुरविण्यासाठी त्यांची धडपड राहते. काही जण तर जीवावर उदार होऊन हा प्रकार करतात. यावेळेस मात्र अतिशय वेगळे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. काही ठिकाणी यासाठी चाचपणी करण्यात आली. परंतु कुठल्याही केंद्राबाहेर काॅपी पुरविणारे दिसत नव्हते. सर्वत्र निरव शांतता होती. पोलिसांचे काॅपी पुरविणाऱ्यांमागे धावणे, परीक्षा केंद्रांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून रागावणे, अशी परिस्थिती दिसली नाही. परीक्षा कक्षातही विद्यार्थी अतिशय शांतपणे पेपर सोडवित होते. भरारी पथकाच्या दराऱ्यामुळे ही परिस्थिती होती, असा दावा शिक्षकांकडून केला जात होता.
नेरमध्ये दहावीचे १४६६ विद्यार्थी देताहेत परीक्षा- नेर तालुक्यात दहाव्या वर्गाचे १४६६ विद्यार्थी विविध केंद्रांवर परीक्षा देत आहेत.- प्रत्येक विद्यार्थी ‘पास’ होईल असा दावा केला जात आहे. या मागचे कारण मात्र त्यांनाच माहिती.
बारावीच्या परीक्षाही शांततेतच सुरू- नेर तालुक्यात बाराव्या वर्गाचे १४९१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.- आतापर्यंत झालेले सर्व विषयांचे पेपर चांगले गेल्याचे विद्यार्थी पूर्ण विश्वासाने सांगत आहेत.
गुरुजीच परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्याची चर्चा
- प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिलेल्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांची झुंबड नव्हती. मात्र, काही ठिकाणी गुरुजीच मदतीला धावल्याची चर्चा होती.
- विद्यार्थी सर्व सोयीनिशी परीक्षा देण्यासाठी आल्याची चर्चा होती. तरीही पथकांना काॅपी सापडली नाही, याविषयी आश्चर्यच आहे.
काॅपीविरहित परीक्षाभरारी पथकाने काही परीक्षा केंद्रांवर धाडी टाकल्या. परंतु कुठल्याही केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळले नाही. रनर, ग्रामसेवक, पटवारी, बैठे पथक यामुळे काॅपी विरहित परीक्षा पार पडत आहे.- मंगेश देशपांडे, गटशिक्षणाधिकारी, नेर