लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात वाढ केली आहे. सप्टेंबरपासून या नियमाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या आणि वृद्ध महिलांना एक हजार रूपयांचे मानधन मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना होणार आहे. यामुळे निराधारांच्या मानधनापोटी होणाऱ्या खर्चात सहा कोटींची वाढ होणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.अशा व्यक्तींना एक अपत्य असेल तर ११०० आणि दोन अथवा त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर १२०० रूपये मानधन दिले जाणार आहे. ही अपत्ये २५ वर्षांचे होईपर्यंतच मानधन निराधारांना मिळणार आहे. त्यानंतर ते थांबविले जाणार आहे. आपल्या पाल्याने आई वडिलांचा सांभाळ करावा हा यामागचा उद्देश आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना हे वाढीव मानधन दिले जाणार आहे. या पाच योजनांचे जिल्ह्यात एक लाख ५८ हजार २२१ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना पूर्वी नऊ कोटी ४९ लाख ३२ हजार ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते.वाढीव मानधनामुळे हा निधी १५ कोटी ८२ लाख २१ हजार रूपयांवर पोहचला आहे. यामध्ये सहा कोटी ३२ लाख ८८ हजार ४०० रूपयांची वाढ झाली आहे. मानधन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे निराधार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून २० हजार१८ ते ६४ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अशा कुटुंबाला २० हजारांची मदत शासनाकडून दिली जाते. जिल्ह्यातील ११७० लाभार्थ्यांना ही मदत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे.
निराधारांच्या मानधनात सहा कोटी रुपयांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निराधारांच्या मानधनात ४० टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे मानधन ६०० रूपयांवरून १००० रूपयांवर पोहचले आहे. दर महिन्याला हजार रूपयाप्रमाणे हे मानधन दिले जाणार आहे. मानधन देताना काही निकषही सुधारण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदीड लाख लाभार्थ्यांना दिलासा : सहाशे रुपयांवरून मानधन झाले हजार रुपये