दूषित पाणीपुरवठा : आरोग्य विभागाचा सर्व्हे, नागरिकांना सावधानतेचा इशारा यंदा मृग नक्षत्रातच पुसद शहर व तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला असून नदी, नाले, विहिरी, हातपंप आदींचे पाणी वाढले आहे. ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तालुक्यातील दूषित पाण्याचे स्त्रोत पाहता नागरिकांना सावधानतेचा इशाराही आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : आरोग्य विभागाच्यावतीने नुकताच पिण्याच्या पाण्याबाबत व स्वच्छतेबाबत तालुक्यात एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार सहा गावांना रेडकार्ड देण्यात आले असून या गावातील पाणी पिण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. येथील नागरिकांनी पूर्णपणे सावध राहून व्यक्तिगत स्तरावर शुद्ध पाणी पिण्यासाठी प्रयत्नरत असणे गरजेचे आहे. पाणी उकळून थंडकरून पिणे हा त्यातील सर्वाधिक चांगला व सोपा मार्ग आहे. या सर्व्हेमध्ये तालुक्यातील तब्बल ९६ गावांना पिवळे कार्ड तर केवळ १७ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. या गावांमधील पाणी तेथील नागरिकांना पिण्यास कोणतीही हरकत नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात एकूण १७८ गावे असून ११९ ग्रामपंचायती आहे. तालुक्यात जांबबाजार, चोंढी, बेलोरा, फेट्रा, शेंबाळपिंपरी व गौळ बु. या सहा गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तर ४७ आरोग्य उपकेंद्र असून एकूण ५३९ शासकीय जलस्त्रोत आहे. भंडारी, हनवतखेडा, गौळ मांजरी, हिवळणी, नानंद-१ व नानंद-२ या सहा गावांना रेडकार्ड म्हणजे येथील पिण्याचे पाणी अयोग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गावांमध्ये सार्वजनिक विहिरी व हातपंपांद्वारा पाणीपुरवठा केला जातो. मात्र येथील पाणी पिण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जांबबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ गावांमध्ये १४० शासकीय जलस्त्रोत आहे. त्यातील दोन स्त्रोत तीव्र जोखमीचे, १०५ स्त्रोत मध्यम तर ३३ पाण्याचे स्त्रोत अल्प जोखमीचे आहे. चोंढी प्राथमिक केंद्रांतर्गत ३६ गावे असून १०६ शासकीय जलस्त्रोत आहेत. यातील ७५ जलस्त्रोत मध्यम जोखमीचे, ३१ जलस्त्रोत अल्प जोखमीचे आहे. बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ गावांमध्ये ४७ शासकीय जलस्त्रोत असून दोन जलस्त्रोत तीव्र जोखमीचे आहेत, तर ४५ जलस्त्रोत मध्यम जोखमीची आहेत. शेंबाळपिंपळ केंद्रांतर्गत २३ गावांमध्ये ७९ जलस्त्रोत आहे. त्यातील दोन तीव्र जखमीची असून ७२ मध्यम व पाच अल्प जोखमीची आहेत. गौळ बु. आरोग्य केंद्रांतर्गत ५० गावात १०७ जलस्त्रोत आहेत. त्यापैकी ६९ मध्यम, तर ३८ अल्प जोखमीची आहे. फेट्रा केंद्रांतर्गत २९ गावांमधील ५४ जलस्त्रोत मध्यम व तीन अल्प जोखमीची असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अतिशय सतर्कतेने करणे गरजचे आहे. जलजन्य आजाराची तीव्र शक्यता पावसाळ्यात दूषित पाणी पिल्यामुळे जलजन्य आजाराची शक्यता असते. नागरिकांनी उकळून थंड केलेले पाणी पिणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावत असल्याने शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, सार्वजनिक विहिरींचे नियमित शुद्धीकरण करावे, दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा, उघड्यावर शौचास बसू नये, जेवणापूर्वी व शौचानंतर साबनाने हात स्वच्छ धुवून घ्यावेत, आपले गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यास नागरिकांनी सहकार्य केल्यास पावसाळा आजारमुक्त करता येईल. त्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी केले आहे.
पुसदमध्ये सहा गावांना रेडकार्ड
By admin | Published: June 22, 2017 1:08 AM