युवक काँग्रेसच्या सहा विधानसभा अध्यक्षांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:25 PM2018-09-13T22:25:07+5:302018-09-13T22:25:41+5:30
जिल्हा युवक काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी करून निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत विजयी झाले. पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान न घेता थेट नियुक्त्या केल्या जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा युवक काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी करून निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत विजयी झाले. पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान न घेता थेट नियुक्त्या केल्या जाईल.
जिल्हा युवक काँग्रेसच्या निवडणुकीत पहिल्यांदा गटातटाचा वाद न होऊ देता पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षासह सहा विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. एनएसयुआयच्या निवडणुकीत प्रचंड गटबाजी झाली होती. त्यामुळे युवकच्या निवडणूकीवर सुरूवातीपासूनच नेते मंडळींचा वॉच होता. मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झाली. यावेळी विजयी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून अतुल राऊत विजयी झाले. उपाध्यक्ष म्हणून तालिब शेख, प्रमोद बगाडे, आकाश आत्राम, महासचिव अतुल राठोड, सागर डंभारे, व्यंकटरमण एल्टीवार, आमीन शेख, भगवान पंडागडे, वैभव जवादे विजयी झाले.
उमरखेड विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण, उपाध्यक्ष निरंजन चव्हाण, महासचिव सोनू खतीब, शहाबुद्धीन, सलमा पिंजारी, शिवाजी वानखडे, राहुल वानखडे विजयी झाले. दिग्रस विधानसभा अध्यक्ष नंदू ठाकरे, उपाध्यक्ष सागर तिमाणे, महासचिव अमोल गुघाणे, इम्रान शेख, आकाश चिरडे, राहुल इंगोले, पवन जाधव यांची निवड झाली. राळेगाव विधानसभा अध्यक्ष म्हणून वसीम पठाण, उपाध्यक्ष चंद्रशेखर परचाके, महासचिव अमोल मेश्राम, कुणाल पंचबुध्दे यांची निवड झाली. आर्णी विधानसभाअध्यक्ष म्हणून अतुल देशमुख यांची निवड झाली.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर स्थानिक नेतेपुत्रांचाच दबदबा कायम असल्याचे दिसून येते. वणी, आर्णी, यवतमाळमध्ये अपेक्षितच निकाल लागले. जिल्हाध्यक्षपदी ठरल्याप्रमाणे अतुल राऊत निवडून आले. ही संपूर्ण निवडणूक राहुल माणिकराव ठाकरे व जितेंद्र शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
यवतमाळ अध्यक्षपदी विक्की राऊत
यवतमाळ विधानसभा अध्यक्षपदी अमेय उर्फ विक्की राऊत, उपाध्यक्ष राजीक पटेल, महासचिव गजानन पायघन, राजवर्धन गाडे, वासिक अली यांची निवड झाली.
वणी विधानसभा अध्यक्षपदी प्रदीप तोटावार
वणी विधानसभा अध्यक्ष प्रदीप तोटावार, उपाध्यक्ष सचिन टाले, महासचिव रोहित राऊत, चंद्रशेखर बोनीवार, आकाश किन्हाके, छगण भोयर, रहीम शेख यांची निवड झाली.