यवतमाळ : जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. टीव्ही पाहणाºया, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर, कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.
पैनगंगा नदीच्या अलिकडील भागात हे धक्के जाणवले आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. जिल्ह्याच्या मराठवाडा सीमेवरील बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये हे धक्के जाणवले आहे. महागाव तालुक्यातील करंजखेड, कासारबेहळसह सहा गावांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले.
होय, धक्के जाणवले - जिल्हाधिकारीदरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, उमरखेड तालुक्यातील ढाणकी व परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नुकतीच मिळाली. या माहितीची प्रशासनाकडून खातरजमा केली जात आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही कुठे अशाच पद्धतीने भूकंपाचे धक्के जाणवले का याची माहिती घेतली जात आहे. मात्र हे धक्के अगदीच सौम्य स्वरूपाचे असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.