यवतमाळ : जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात सीमावर्ती भागात गांजा तस्करी चालते. तेलंगणातील अदिलाबाद येथून गांजाची खेप घेऊन आलेल्या तस्काराला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. रविवारी पहाटे रुंझा येथील पेट्राेल पंप परिसरात तस्कर उभा असताना, त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ८ किलाे ८७० ग्राम गांजा जप्त केला. पाढंरकवडा पाेलिस व एलसीबी पथकाने गस्तीवर असताना, ही कारवाई केली.
पाेलीस पथकाला खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, एक निळ्या रंगाचे शर्ट घातलेला व्यक्ती प्लास्टिकच्या पाेत्यामध्ये गांजा घेऊन रुंझा गावाच्या बाहेर यवतमाळ रोडवरील पेट्रोलपंपाजवळ उभा आहे. त्यावरून पथकाने तत्काळ वरिष्ठांना याची माहिती देऊन ते ठिकाण गाठले. तेथे संशयित व्यक्ती दिसून आली. त्याला ताब्यात घेऊन चाैकशी सुरू केली. त्याच्याकडे प्लास्टिक पाेत्यामध्ये गांजा आढळून आला. अलीम खान सलीम खान (वय २९ वर्षे, रा. अबुबकर मशीदजवळ, शांतीनगर, अदिलाबाद, तेलंगणा) असे आराेपीचे नाव आहे. त्याच्याकडे खाकी टेपने गुंडाळलेल्या वेगवेगळया चार पाकिटांमध्ये एक लाख पाच हजार २०४ रुपयांचा गांजा, एक मोबाइल आढळून आला. पाेलिसांनी त्याला तत्काळ अटक करून पांढरकवडा ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीप्रमुख आधारसिंग सोनोने, पाढंरकवडा ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर, विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, उल्हास कुरकुटे, धनंजय श्रीरामे, मारोती पाटील, सचिन काकडे, राजू बेलेवार यांनी केली.