समाजात स्त्रियांबाबत कितीही गौरवोद्गार काढले जात असले तरी तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहण्यात येते. त्यात पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलींची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यांच्या असहायतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन आजही मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये विक्री केली जाते. हे धक्कादायक वास्तव पुढारलेल्या समाजाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. यवतमाळ शहरालगतच्या नागपूर मार्गावर जिनिंगमध्ये कामाला असलेल्या मुलींना अशाच पद्धतीने फासात अडकवून त्यांची अक्षरश: मध्य प्रदेशात विक्री करण्यात आली. हा व्यवहारही केवळ १५ हजारांत झाला. सुदैवाने पित्याच्या तक्रारीवरून रॅकेट उघड झाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून व समाजाच्या विविध घटकाकडून उपाययोजनांच्या वल्गना केल्या जातात. महानगरा प्रमाणेच ग्रामीण भागातीलही मुली व महिला आजही असुरक्षित आहे. त्यांच्या असह्यतेचा फायदा घेण्यासाठी अनेकजण टपलेले आहेत. सामाजिक जडणघडण विस्कटल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुर्दैवाने याकडे कुणी लक्षच देत नाही. मुली मिळत नाही म्हणून अपहरण करून अथवा विकत घेऊन जबरदस्ती लग्न करण्याची प्रथाच पडली आहे, तर दुसरीकडे मोलमजुरीसाठी घरापासून कित्येक महिने, वर्ष वयात आलेल्या मुलींना दूर राहावे लागते. अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. यातूनच अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. बाभूळगाव तालुक्यातील एका गावात राहात असलेली दीपिका हिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबत ब्युटी पार्लरसारखा कोर्सही केला. त्यानंतरही आर्थिक समस्येमुळे तिला जिनिंगमध्ये कामाला जावे लागले. याच जिनिंगमध्ये तिची ओळख प्रियंका हिच्याशी झाली. प्रियंकाचे आई-वडील गावसोडून मजुरीसाठी कुण्यातरी शेटच्या गोठ्यावर कामाला होते. त्यामुळे प्रियंका घरात एकटीच राहात होती. तिने जिनिंगमध्ये काम सुरू केले. दीपिकासोबत मैत्री झाली. प्रियंका-दीपिका एकत्र राहू लागल्या. कामावर असलेल्या इतर दोन महिलांनी या मुलींकडून हात उसणवार म्हणून दोन हजार रुपये घेतले. इथेच दोघींची फसगत झाली. हे पैसे घेऊन या महिलांनी पोबारा केला. उसणवारीचे पैसे परत घेण्यासाठी या दोघींना वर्धा येथे बोलवण्यात आले. वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात आरोपी राधेश्याम मदनलाल बोडादा (३१) मूळ रा.मध्य प्रदेश हल्ली मु.हळदगाव ता.समुद्रपूर जि.वर्धा याच्याशी ओळख झाली. या मुलींना बोलविणाऱ्या लता आणि निर्मला या दोन महिलाही येथे होत्या. त्यांनी या दोघींना वर्धेतून चंद्रपूर आणि नंतर नागपूर येथे नेले. पैसे द्यायचे सोडून दोघींना नागपूरवरून थेट मध्य प्रदेशातील उजैन जिल्ह्यातील तराना या गावी नेण्यात आले. दोन दिवसातच दीपिका व प्रियंकाचा मनोज बन्सीलाल कलेरा (२३), महेश गोविंद कलेरा (२५) यांच्याशी विवाह लावण्यात आला. त्या दोन महिला आणि राधेश्याम दोघेही तेथून परत निघून गेले. जाताना दोन्ही मुलींना व्यवस्थित राहा, तक्रार आल्यास जीवानिशी मारू, अशी धमकी देऊन त्या परतल्या. यातील प्रियंकाचा पती मनोज हा हलवाईचे काम करत होता. तर दीपिकाचा पती महेश हा गॅरेजमध्ये कामाला जात होता. मात्र त्याचा मुख्य व्यवसाय घरून गांजा विक्री करणे हा होता. या प्रकरणात प्रियंकाच्या वडिलाने शहर ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली. शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाचे उपनिरीक्षक मंगेश भोयर यांनी तपास सुरू केला. जिनिंगवरून काम सोडून गेलेल्या महिलांचा शोध त्यांनी सुरू केला. या दोन्ही महिला गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात राहात असल्याचे निष्पन्न झाले. या महिलांना ताब्यात घेताच मुलींची मध्य प्रदेशात विक्री केल्याचे वास्तव पुढे आले. केवळ १५ हजार रुपयांत या मुलींची विक्री केल्याचे या महिलांनी सांगितले. दलाल राधेश्याम आणि या दोन महिलांनी प्रत्येकी पाच हजार रुपये वाटून घेतल्याचे कबूलही केले. पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबतच जबरदस्ती लग्न करणारे त्यांचे पती यांनाही अटक केली. यात सहा महिन्यांच्या कालावधीत दीपिका ही गर्भवती असल्याचे आढळून आले. तिची कौटुंबिक परिस्थिती नसल्याने तिला महिला बालकल्याण विभागाकडून संगोपनासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी तुरुंगाची हवा खात आहेत.
मोलमजुरी करणाऱ्या मुली बनताहेत तस्करीचे साधन
By admin | Published: February 05, 2017 12:56 AM