राज्यात बंदी केवळ नावापुरती उरली आहे. तालुक्यात थेट अमरावती आणि अर्णीवरून दररोज पाच ते सहा लाखांची गुटख्याची खेप उतरवली जात आहे. झिरो झिरो तीस क्रमांक असलेल्या एका वाहनातून रोज रात्री तालुक्यातील गुंज, हिवरा, सारकिन्हीसह अन्य खेड्यात व मोठ्या बाजारपेठेत गुटख्याची विक्री सुरू आहे.
हे वाहन चांगलेच प्रचलित झालेले आहे. तालुक्यातील पोहंडूळ हे सध्या सुगंधित तंबाखू, गुटखा विक्रीचे केंद्रबिंदू बनले आहे. अन्न व औषध प्रशासन डोळ्यावर कातडे ओढून झोपले आहे. मागील वर्षभरात एखादी तुरळक कारवाई झाली आहे. त्यामुळे लागेबांधे असलेल्या गुटखा तस्करांचे फावत आहे. महागाव तालुक्यासह लगतच्या तालुक्यातही तस्करांनी जाळे निर्माण केले आहे. लाखोंच्या गुटखा विक्रीप्रकरणी स्थानिक प्रशासनाला माहिती नाही, हे सुद्धा आश्चर्यकारक आहे.
कोरोनाच्या काळात गुटख्याचे भाव चांगलेच वधारले आहे. गुटखाप्रेमी चढ्या दराने गुटखा विकत घेतात. त्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.