चित्रपट, मालिका आणि कार्टूनची छाप : बरेली, गुजरातच्या स्पर्धेत महाराष्ट्रीय मांजा, पतंग विक्रीमध्ये कमालीची वाढयवतमाळ : मकरसंक्रांतीच्या पर्वाकरिता खास पतंग बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या पतंगांवर स्वच्छतेचा संदेश रेखाटण्यात आला आहे. यासोबतच चित्रपट, मालिका आणि कार्टूनचे सुरेख चित्र पतंगांवर साकारण्यात आले आहेत. या माध्यमातून पतंगाचा लुक बदलविण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून करण्यात आला आहे. याला ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे.सूर्याचे संक्रमण मकरसंक्रांतीला घडते. हा सण एकमेकांना तिळगुळ देऊन साजरा केला जातो. तर याच पर्वावर गुजरातमध्ये पतंग उडविण्याची मोठी परंपरा आहे. या परंपरेचे लोण महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. पूर्वी केवळ उन्हाळ्यात दृष्टीस पडणाऱ्या पतंग संक्रांतीच्या पर्वावर आकाश व्यापून टाकत आहेत. काळानुरूप बदललेला ग्राहकांचा कल व्यावसायिकांनी हेरला आहे. मोठ्या प्रमाणात बाजारात पतंग आल्या आहेत. पतंगांवर कलाकौशल्याचा वापर करण्यात आला आहे. पूर्वी कागदाच्या पतंग दिसायच्या. आता प्लास्टिक आणि कापडाच्या पतंगही बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षकता आणण्यात आली आहे. यासाठी चित्रपटातील नट-नट्या, आवडते कार्टून आणि मालिकांतील दृश्यही पतंगांवर रेखाटण्यात आले आहे. यामध्ये बाहुबली, पिके, दिलवाले यासह विविध चित्रपटातील अभिनेत्यांचे छायाचित्र साकारण्यात आले आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पतंगही बाजारात आहेत. चित्रपटासोबत मनोरंजनात अग्रेसर असलेली ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ पतंगही बाजारात आली आहे. बच्चे कंपनीचे कार्टूनचे वेड लक्षात घेत छोटा भीम, डोरोमॉन, अँग्रीबर्ड यासारखे कार्टून पतंगांवर साकारण्यात आले आहेत. याला चांगली मागणी आहे. टायगर, फुलपाखरू, डायनासोरच्या आकाराच्या पतंग बाजारात आहे. याची किंमत २ रूपयांपासून ३५० रूपयांपर्यंत आहे. (शहर वार्ताहर)
मकर संक्रांतीच्या पतंगातून मिळतेय सामाजिक समरसता
By admin | Published: January 11, 2016 2:18 AM