सोशल ग्रुपचा पुढाकार : जीवनावश्यक वस्तू, औषधांचे वाटप
दारव्हा : येथील पूरग्रस्त नागरिक, अपघातात कर्ता पुरुष गमावलेले कुटुंब तसेच गरीब प्रसूत महिला आदी गरजूंना जीवनावश्यक वस्तू, औषधांसह विविध प्रकारची मदत करण्यात आली.
यासाठी सोशल ग्रुपने पुढाकार घेत व्हाॅट्स ॲपद्वारे निधी गोळा केला. त्यामुळे घरपोच साहित्य पोहोचविले. संकटकाळी मदतीला धाऊन जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे. शहरात नाल्याच्या पुराचे पाणी नाल्याकाठच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे माती-कुडाची घरे खचली. अन्नधान्य, कपडे यासह इतर साहित्य भिजल्याने नागरिकांचे नुकसान झाले. त्यांचे हाल पाहून अस्वस्थ झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
व्हाॅट्स ॲपवरच्या संदेशाला अनेकांनी प्रतिसाद दिल्याने दोन दिवसात ७१ हजार रुपये गोळा झाले. या पैशातून किराणा, जीवनावश्यक वस्तूंची किट तयार करून ५६ आपद्ग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आल्या. येथील बालरुग्णांना एका बाल रुग्णालयातर्फे नि:शुल्क वैद्यकीय मदत केली जणार आहे. टाकळीच्या वृद्धाचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर संकट कोसळले. ग्रुपच्या सदस्यांनी भेट घेऊन त्यांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंची मदत व दोन मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली. चहा कँन्टीन चालविणाऱ्याच्या मुलीची प्रसूती झाल्याने माता आणि बाळाच्या उत्तम प्रकृतीसाठी अन्नधान्य किट व प्रोटीन पावडर, रक्तवर्धक टाॅनिक, गोळ्या व आवश्यक औषधी देण्यात आली. पुढील उपचार मोफत केला जाणार आहे.
या मदत कार्यासाठी सोशल ग्रुपचे डॉ. मदन पोटफोडे, डॉ. मनोज राठोड, चंद्रशेखर वाळके, डॉ. वसीउल्ल्हा, ॲड. नितीन जवके, ॲड. अमोल चिरडे, संजय बिहाडे, श्याम पांडे, मनीष पनपालिया, डॉ. रामधन हिरे, प्रमोद राऊत, राजेंद्र घाटे, राम पापळकर, गणेश भोयर, आनंद झोळ, सागर चक्रे, असलम खान, विठ्ठल नामजप मंडळाचे किशोर गुल्हाने, प्रकाश उघडे, गणेश बिहाडे, बबनराव इंझाळकर, अरुण कळंबे आदींनी पुढाकार घेतला.
बॉक्स
सोशल मीडियाद्वारे सामाजिक कार्य
सोशल मीडियाद्वारे केवळ करमणूक नव्हे, तर विधायक कार्य करता येऊ शकते, हे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. यापूर्वीही विविध ग्रुपच्या माध्यमातून अनेक कार्यात सहभाग घेतला. शहर हिरवेगार करण्यासाठी मेक ग्रीन चळवळ राबविली. वंचितांना दिवाळी भेट, केरळ, कोल्हापूर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी निधी गोळा करून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
290721\img-20210725-wa0007.jpg
गरजुंना जिवनावश्यक किट देतांना सोशल ग्रुपचे कार्यकर्ते