पालकमंत्र्यांचे प्रयत्न : राज्यात तीन प्रकल्प यवतमाळ : शेतकऱ्यांना पुरेशा दाबाचा वीज पुरवठा देण्यासाठी कृषी फिडर सौरउर्जेवर चालविण्यात येणार आहे. २ मेगावॅट सौरउर्जेचा पथदर्शी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी, सोलापूर जिल्ह्यातील सालसे व नगर जिल्ह्यात करजुळे पठार येथे उभारण्यात येणार आहे. उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकारत आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात वीज पुरवठ्याची समस्या प्रामुख्याने विचारात घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मुबलक तसेच पुरेशा दाबाचा वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. विजेअभावी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री जाऊन ओलित करावे लागते. ही स्थिती सुधारण्यासाठी व सौरउर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शेतीसाठी विजेची स्थिती सुधारली असली तरी पर्यावरणसंवादी विजेचा शेतीसाठी वापर करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने २ मेगावॅटचा सौर उर्जा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी अकोलाबाजार फिडरवर मांजर्डा येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच करजुळे पठार, संगमनेर ता. जि. नगर, व सोलापूर जिल्ह्यातील सालसे ता. बार्शी येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कृषी फिडरचे विलगीकरण झाले आहे. त्या ठिकाणी खासगी विकासकाच्या माध्यमातून कृषी फिडरचे सौरउर्जेवर विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना विजेच्या योग्य दाब तसेच दिवसा वीज मिळेल. राज्यात पहिल्यांदाच असा प्रकल्प राबविण्यात येणार असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कोळंबी-अकोलाबाजार परिसरात सौरऊर्जा प्रकल्प
By admin | Published: March 17, 2017 2:45 AM