मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल, तर प्रतिकूल परिस्थिवर मात करुन ध्येय गाठता येते. याची प्रचिती तालुक्यातील लाडखेड येथील शेतमजूर कुटुंबातील मुलाने आणून दिली. संदीप पानतावणे याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झेप घेतली.संदीप ज्ञानेश्वर पानतावणे याची राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, शिक्षक ते जिल्हा परिषदेचा ‘क्लास-वन’ अधिकारी, असा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. संदीप यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात मोठ कुटुंब. मात्र अशाही परिस्थितीत चार भावंडात सर्वात लहान असलेल्या संदीपने शिक्षण सुरुच ठेवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक विद्यालयात झाले. पुढील शिक्षणाकरिता संदीपने दारव्हा गाठले. मुंगसाजी महाराज महाविद्यालयात कला शाखेत बारावीला असतानाच संदीप बेले या मित्राकडून त्याला स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली. त्याचवेळी त्याने अधिकारी होण्याची खूणगाठ बांधली.
संदीपने २०१० मध्ये प्राथमिक शिक्षक भरतीच्या सीईटी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची जिल्हा परिषदेत शिक्षण सेवक म्हणून निवड झाली. सीईटीसारखी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. २०११ मध्ये महागाव तालुक्यातील माळवाकद येथे शिक्षण सेवक म्हणून तो रुजू झाला. मुक्त विद्यापीठातून २०१४ मध्ये बीए पूर्ण केले. पुसद येथे शिक्षक मित्र विनायक घुगे यांच्या मार्गदर्शनात त्याचा अभ्यास सुरु झाला. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश येऊनही खचून न जाता त्रुटी शोधून अभ्यास सुरूच ठेवला. अखेर २०१८ मध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलीच. त्याला मुख्य परीक्षेला संधी मिळाली. मात्र मुख्य परीक्षेत काही गुणांनी मुलाखतीची संधी हुकली. मग पुन्हा जोमाने तयारी करुन २०१९ मध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मुख्य परीक्षा दिली. यावेळी चांगले गुण मिळाल्याने मुलाखतीस पात्र ठरला. आता त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली.
अपयशाने खचून जाऊ नयेस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सुरुवातीला येणाऱ्या अपयशातून खचून न जाता तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी असा कुठलाही न्यूनगंड मनी न बाळगता अभ्यास करण्याचे आवाहन संदीप पानतावणे यांनी केले आहे. त्रुटी शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच तुमच्या पदरी पडेल, असेही संदीप पानतावणे यांनी स्पष्ट केले.