अखिलेश अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गरिबी जन्माचीच वैरणी. परिणामी जीवनात दु:खाचे अडथळे कायम. मात्र नियतीच्या परीक्षेत कधी पास-नापास होताना केवळ जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर येथील चहा टप्परीवाल्याच्या मुलाने नीटमध्ये यश प्राप्त केले. आता गरिबीमुळे त्याच्यासमोर एमबीबीएस प्रवेशाचे खडतर आव्हान उभे ठाकले आहे.निरज प्रेमसिंग नाईक, असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने देशपातळीवरील नीट परीक्षेत ४६६ गुण प्राप्त केले. मात्र एमबीबीएसचा शैक्षणिक खर्च त्याच्या वडिलांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे निरज समोर पुढील शैक्षणिक खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. समाजातील दानशूरांकडून त्याला मदतची अपेक्षा आहे. अन्यथा त्याचे डॉक्टरकीचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.१८ वर्षांपूर्वी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हेटीनहाल्डी (तांडा) येथून वयाच्या २५ व्या वर्षी घरची परिस्थिती हलाखीची असल्याने निरजचे वडील प्रेमसिंग यांनी गाव सोडले. सातारा, सांगली, पुणे, नाशिक, परतवाडा, वर्धा येथे काम करीत त्यांनी पुसद गाठले. येथील गोविंदनगरात बंजारा समाजाचा आता हा ४८ वर्षीय प्रेमसिंग गोपू नाईक नियतीच्या परीक्षेला तोंड देत पत्नी, मुलगा निरज, मुलगी निर्जलासह वास्तव्य करीत आहे.पंचायत समितीसमोर फूटपाथवर निसर्गाच्या सानिध्यात त्यांची छोटीशी चहा टपरी आहे. त्यांनी चहा टपरीच्या भरवशावरच मुला-मुलीला शिक्षण दिले. निरज व त्याच्या बहिणीने दहावीपर्यंत येथेचे शिक्षण घेतले. निरज अकरावी, बारावीसाठी विजापूर येथे गेला. वडिलांना व्यवसायात मदत करून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याने दहावीत ८५, तर बारावीत ८० टक्के गुण घेतले. नंतर नीट परीक्षेतही त्याने ४६६ गुण प्राप्त केले.डॉक्टर होण्याचे ध्येय उराशी बाळगून त्याने नीट परीक्षा उत्तीर्ण केली खरी, मात्र आता खरा खडतर मार्ग आहे. गुणवान निरजचा हुबळी येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी नंबर लागला आहे. मात्र नियती त्याची अग्निपरिक्षा घेत आहे.वडील चहा व्यवसाय, तर आई निमाबाई खासगी शाळेत कामाला जातात. त्यांच्या मिळकतीतून निरजचा एमबीबीएसचा खर्च पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे निरजसमोर एमबीबीएस प्रवेशाचा डोंगर उभा आहे.दानशूरांकडून तूर्तास ३२ हजारांची मदतगुणवान निरजचा हुबळीच्या मेडिकलमध्ये एमबीबीएससाठी नंबर लागला. त्याची पैशाची अडचण समजताच इंदल राठोड, लक्ष्मण आडे, मधुकर चव्हाण, सुभाड राठोड, जयसिंग राठोड आदींनी त्याच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी लोकवर्गणी करून ३२ हजारांची मदत देऊ केली. निरजला वार्षिक किमान एक ते दीड लाख रुपये शैक्षणिक खर्च येणार आहे. हा खर्च कसा करायचा, असा प्रश्न आहे. त्याचे डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण होऊन त्याच्या हातून समाज सेवा घडावी, यासाठी त्याला समाजाकडून आर्थिक आधार देण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावण्याची गरज आहे.
चहावाल्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:50 PM
गरिबी जन्माचीच वैरणी. परिणामी जीवनात दु:खाचे अडथळे कायम. मात्र नियतीच्या परीक्षेत कधी पास-नापास होताना केवळ जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर येथील चहा टप्परीवाल्याच्या मुलाने नीटमध्ये यश प्राप्त केले. आता गरिबीमुळे त्याच्यासमोर एमबीबीएस प्रवेशाचे खडतर आव्हान उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देनीटमध्ये ४६६ : खर्चाची समस्या, हुबळीच्या मेडिकलमध्ये लागला नंबर, आधाराची गरज