शेतकरी हवालदिल : निसर्गाच्या अवकृपेने बजेट बिघडले, रबी हंगामही संकटातयवतमाळ : निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे. यावर्षी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच धरल्या नाही. तर आता पऱ्हाटीलाही चार ते पाचच बोंडे आहेत. त्यामुळे लावलागवडीचा खर्चही निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात यावर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात पाऊस आला. पिकांना जीवदान मिळाले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अशा स्थितीत तळपत्या उन्हाने सोयाबीन करपून गेले. झाडाची पाने पिवळी पडून गळून गेली. शेंगाही भरल्या नाही. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा त्यात जनावरे सोडणे शेतकऱ्यांना सोईचे झाले. त्यामुळेच सोयाबीनपासून उत्पन्नाची कोणतीही आशा शेतकऱ्यांना नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर किडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरली नाही. सध्या चार ते पाच बोंडे पऱ्हाटीला दिसत आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे.नांगरणीपासून वेचणीपर्यंत शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. बी-बियाणे, मजुरांची मजुरी, अंतर मशागत, रासायनिक खते, फवारणी आदींमध्ये जवळपास एकरी पाच ते पाच हजार रुपये खर्च येतो. आजच्या स्थितीत एकरी दोन क्ंिवटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च निघते की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या कपाशीचे भावही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी आहे. शेतकऱ्यांपेक्षा मजुरांची स्थिती चांगली दिसत आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. रबी हंगामापासून शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु मशागतीसाठीच पैसे नाही. त्यातच भारनियमनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत रबी पिकही शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची शक्यता कमी आहे.गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ येत आहे. अशा स्थितीत शासन मदत घोषित करते. मात्र ही मदतही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता गावागावातील शेतकरी विचारत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सोयाबीन शेंगाविना अन् पऱ्हाटीला पाच बोंडे
By admin | Published: November 16, 2015 2:20 AM