लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी व सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबिनची परिस्थिती तर अशी झाली आहे की, लागवडीचा खर्चही निघाला नाही. तालुक्यात सोमवारी अचानकपणे झालेल्या धुव्वाधार पावसामुळे उरलेसुरले पिकही हातातून गेले आहे. सोयाबीनचे पीक तर एकरी एक क्विंटलही नाही, अशी परिस्थिती आहे.तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोयाबीन या पिकाचे संगोपन केले. उगवण शक्ती न झालेल्या शेतांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. परंतु बियाणे कंपन्याकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुबार पेरणी करून सोयाबिनचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊ, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. १२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरूवातीला अतिशय चांगले पीक होते. यावेळी सोयाबीनचा उतारा निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली. सोयाबिनला शेंगा लागण्याच्यावेळी पावसाने कहर केला आणि शेंगाला अंकुर फुटू लागले. पुन्हा दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले. यातून शेतकरी कसाबसा सावरत नाही, तोच ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी परतीचा पाऊस सुरू झाला.या सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पुन्हा सोमवारी अचानक झालेल्या पावसामुळे उरले सुरले पिकही हाती येणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीन या पिकासाठी पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी १८ हजार रूपये खर्च येतो. परंतु सोयाबिनचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यामुळे एकरी एक क्विंटलही उत्पन्न नाही. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.कपाशी पिकाची परिस्थितीही सारखीच, शेतकरी अडचणीतकपाशीच्या पिकाची परिस्थितीही सारखीच असून सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे सडायला लागली आहे. एकीकडे ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर आलेल्या रोगाचा सामना करावा लागला, तर आता परतीच्या पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मात्र पूर्णत: अडचणीत सापडला आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
सोयाबीनचे पीक एकरी एकही क्विंटल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 5:00 AM
तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर सोयाबीनचा पेरा आहे. परंतु सोयबीनच्या पिकाला सुरूवातीपासनूच दृष्ट लागली. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणाची अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्केच उगवण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कसे तरी सोयाबीन या पिकाचे संगोपन केले. उगवण शक्ती न झालेल्या शेतांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. परंतु बियाणे कंपन्याकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.
ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : सोमवारच्या धुव्वाधार पावसामुळे उरलेले पिकही गेले वाया, लाखो रूपयांचे नुकसान