बोगस बियाण्याची शक्यता : शेतकऱ्यांनी केली वरिष्ठांकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. सदर बियाणे बोगस असल्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे विकत घेतले. त्याची मृगनक्षत्राच्या पावसात पेरणी केली. परंतु आता तीन आठवडे झाले तरी बियाणे उगवले नाही. कळमुला, हातला, झाडगाव, वानेगाव, कुपटी, नागापूर, बारा, बेलखेड, मरसूळ, नागेशवाडी, मार्लेगाव, चिल्ली, सुकळी, आंबाळी, पिरंजी, बाळदी, कृष्णापूर, चातारी, देवसरी, दिघडी, उंचवडद, चालगणी, टाकळी, तिवडी, ढाणकी आदी गावात सोयाबीनची पेरणी झाली आहे. दागदागिने मोडून आणि खासगी सावकाराचे कर्ज घेवून सोयाबीन बियाणे विकत घेतले होते. परंतु आता बियाणे उगवले नसल्याने शेतकरी खचून गेले. या प्रकाराची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषी विभाग, पंचायत समिती, कृषीमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागात मंगळवारी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा खच पडला होता. सदर बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नवे संकट शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी बँकांकडून नवीन कर्ज मिळाले नाही. त्यातच बोगस बियाण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन नगदी पीक असल्याने पहिली पसंती दिली. परंतु बोगस बियाण्यांमुळे अर्थकारण धोक्यात आले आहे. दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही. संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
उमरखेडमध्ये सोयाबीन उगवलेच नाही
By admin | Published: July 02, 2017 1:38 AM