लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी साडेसात हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर साेयाबीनला मिळाला होता. यावर्षी सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच साेयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकरी चांगलेच हादरले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानेे आणि ढेपीच्या मागणीत सुधारणा झाल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील असा अंंदाज व्यापारी वर्तवित आहेत. बाजारपेठेतील सोयाबीन दराबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. याच सुमारास सोयाबीनचे दर सुधारत असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. या दरात आणखी सुधारणा होईल काय याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.किमान गतवर्षीच्या सोयाबीन दराची रेंज मिळेल काय, याबाबत शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला मिळणारे दर परवडणारे नाही. यातून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापासून थांबला आहे. आता बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. पुढील आठवड्यात बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढण्याचे संकेेत आहेत. रब्बीची पेरणी तोंडावर आहे. सोयाबीन काढणीला मोठा पैसा खर्च झाला आहे. हातात पैसेच शिल्लक राहिले नाहीत. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली होती. परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दोन वर्षापूर्वी सोयाबीनला याच पद्धतीचा दर मिळाला होता. परतीच्या पावसाने नुकसान झालेले असतानाही सोयाबीनच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातूनच सोयाबीन विकताना शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला.
अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणीजिल्ह्यात यावर्षी अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. गतवर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोयाबीनचे मिळणारे दर पाहून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला होता. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीला आल्यानंतर सोयाबीनचे दर घसरले. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. शेतमालाचे दर सुधारतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करणे थांबविले आहे. या परिस्थितीत दरामध्ये आणखीन सुधारणा झाली तर शेतकऱ्यांचा शेतशिवारातील घाटा थोडाफार भरून निघेल.
सोयाबीन उत्पादकांची धाकधूक वाढलीदरातील चढ-उताराने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. उत्पादन घटले आहे. याच दर घटले आहेत. यामुळे पुढे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
शेतकऱ्यांनी घेतला सावध पवित्रादरातील चढ-उतार पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली आहे. आवश्यकता पडेल तितकेच सोयाबीन विकले जात आहे. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दर वधारल्यानंतरच सोयाबीन विक्रीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.