लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच सोयाबीनला किमान चार हजार, तर कमाल चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
शासनाचा हमीभाव कागदावरच आहे. प्रत्यक्ष भाव कमी मिळत आहे. सोयाबीन बाजारात येण्याआधी शासनाने जरी आयात शुल्कात वाढ केली, तरी मात्र प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी जागतिक बाजारपेठ व पुढील नियोजन करूनच सोयाबीन खरेदी करीत आहेत.
शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीपासून तर पेरणी, फवारणी आणि सोयाबीन काढणी आदी कामांसाठी खूप मोठा खर्च येतो. मात्र सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरणच होत आहे. शिवाय विविध कारणांमुळे सोयाबीनचा उताराही घटत आहे.
दरवाढीच्या आशेने सोयाबीन घरात दरामध्ये वाढ होईल या आशेने काही शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून सोयाबीन राखून ठेवले आहे. आता विकायला काढण्याचा प्रयत्न केला तरी चांगला भाव मिळत नाही. नाईलाजाने त्यांना मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. शासनाच्या कृषी धोरणावर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सोयाबीनचा हमीभाव चार हजार ९०० रुपये प्रती क्विंटल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा किती तरी कमी दराने खरेदी करावी लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.