रक्षकच बनले भक्षक : बायपास झाला लुटमारीचा अड्डायवतमाळ : शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार्ली कमांडो पथकांची निर्मिती केली. त्यांना वॉकीटॉकीसह सुसज्ज वाहनेही दिली. मात्र या चार्ली कमांडोंनी गेल्या काही दिवसात यवतमाळ शहरात अक्षरश: उच्छाद मांडला. भरधाव वाहने चालवून लोकांवर रूबाब दाखविण्याचा प्रयत्न चालविला. एवढेच नाही तर चौकात ठाण मांडून तासन्तास मोबाईलवर गप्पा हाकण्याचेही प्रकार सुरू झाले. आता त्यांचे अनेक काळे धंदेही चर्चेला येत आहे. शहरसोडून बायपासवर त्यांचा राबता वाढला आहे. एका चार्ली कमांडोने केलेल्या काळ्या कृत्याने संपूर्ण पोलीस दलाचीच मान शरमेने खाली गेली आहे. आता या चार्ली कमांडोंना आवरा हो, अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. वर्षभरापूर्वी यवतमाळ शहरात मंगळसूत्र चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. उच्चभ्रू आणि प्रतिष्ठीतांच्या वसाहतींना लक्ष्य करून शेकडो मंगळसूत्र या टोळक्याने लंपास केली होती. शिवाय जबरी चोर्या आणि घरफोडीचेही सत्र सुरूच होते. या गंभीर घटनांना चाप बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार्ली कमांडो पथकाचे गठन केले.त्यांना वॉकीटॉकी आणि सुसज्ज दुचाकी वाहने दिली. दिवसा आणि रात्री गस्त घालून संशयितांची चौकशी करायची, संशय बळावलाच तर पोलीस ठाण्यात संबंधिताला पोहोचवून त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यामार्फत कसून चौकशी करायची. या शिवाय बायपास मार्गावरून होत असलेली दारूची तस्करी रोखायची अशा अनेक जबाबदार्या त्यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. मात्र यातील एकही जबाबदारी या चार्ली कमांडो पथकाला सांभाळता आली नाही. मंगळसूत्र चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सिंहाचा वाटा आहे.गेल्या पाच महिन्यात यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हद्दीत जबरी चोरी आणि घरफोडीच्या सुमारे ४0 घटना घडल्या. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख असा कोट्यवधीचा ऐवज चोरीस गेला. रात्री कुलरमधील पाण्यात गुंगीचे औषध टाकून चोरटे ऐवजावर हात साफ करीत आहे. असे असताना चार्ली कमांडोंच्या गस्तीत एखादा चोरटा आढळला नाही. त्यावरून चार्ली कमांडोच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. रात्रीची वेळ तर सोडाच दिवसाही चार्ली कमांडो पथकातील अनेक कर्मचारी चौकात रस्त्याच्या कडेला दुचाकी लावतात. त्यानंतर तासन्तास मोबाईलवर गप्पा हाणण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरे कामच नसते. दारूची तस्करी रोखण्यासाठी ते शहरासभोवतालच्या बायपास मार्गावर गस्त घालतात. बोटावर मोजण्याइतके त्यातल्या त्यात तेच ते व्यक्ती अवैध दारूचा व्यवसाय करीत असल्याने त्यांची तोंडओळख चार्ली कमांडोंना आहे. अनेकदा दारू वाहून नेताना त्यांना कमांडो पकडतात. मात्र त्यानंतर चिरीमिरी घेवून त्यांना परस्परच सोडून दिले जाते. अनेक प्रेमीयुगुल आपल्यावर कुणाची नजर पडू नये म्हणून बायपासचा आधार घेतात. प्रेमीयुगुलांचे बायपासवर जाण्याचे प्रकार सर्मथन करणारे निश्चितच नाही. तरीदेखील धोका पत्करून ते बायपास मार्गावर जातात. अनेकदा नको त्या अवस्थेतही प्रेमीयुगुल आढळून येतात. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत त्यांची चौकशी केली जाते. कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी केली जाते. अनेकदा तर मोबाईल आणि दागिने ठेवल्याचे प्रकारही घडले आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ही प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत नाही. आता तर चक्क एका चार्ली कमांडोवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाची लक्तरेच वेशीवर टांगल्या गेली आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ज्या उदात्त हेतूने या चार्ली कमांडो पथकाचे गठन केले होते त्यालाच कमांडोंच्या कृत्यांनी हरताळ फासला जात आहे. त्यामुळे आता चार्ली कमांडोंवरच नजर ठेवण्याची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. नव्हेतर एसपी साहेब, चार्ली कमांडोंना आवरा हो! असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
एसपी साहेब, चार्ली कमांडोंना आवरा हो!
By admin | Published: June 09, 2014 12:08 AM