दिग्रस : सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याच्या पाहणीकरिता पंचायत समितीच्या सभापती थेट बांधावर पोहोचल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
तालुक्यात सप्टेंबरमध्ये संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. नदी, नाल्याच्या काठावरील शेतात व घरात पाणी शिरले. अति पावसामुळे संपूर्ण सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले. पाण्याने घरातील अन्नधान्याची नासाडी झाली. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती अनिता राठोड यांनी त्वरित गटविकास अधिकारी रमेश खारोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, कृषी अधिकारी डाखोरे यांना सोबत घेऊन वसंतनगर, फेटरी, कांदळी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील चिखलात शेताची पाहणी केली. त्यांनी त्वरित सर्वे व पंचनामे शासनाकडे पाठवावेत, असे आदेश कृषी विभागाला दिले.