समस्यांची मालिका : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, केवळ आश्वासनांची खैरात, योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी कळंब : अपंगांच्या समस्या वर्षानुवर्षांपासून जैसे-थे आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांना गुजरान करावी लागत आहे. यासाठी अपंगांच्या संघटनांनी अनेक आमदारांचे उंबरठे झिजविले. प्रत्येकवेळी मानधन वाढ व समस्या सोडविण्याची आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात प्रश्न कायम आहे. त्यामुळे अपंगांमध्ये नाराजीचा सूर आहे. अपंगांचे मानधन दोन हजार रुपये प्रतिमाह करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी अनेकदा मंत्री व आमदारांना निवेदने देण्यात आली. परंतु ६०० रुपये प्रतिमाह देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. सहाशे रुपये प्रतिमाहमध्ये जीवन कसे जगावे, असा त्यांचा प्रश्न आहे. अपंगांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. घरकुलासाठी वारंवार चकरा मारल्यानंतरही तुसडेपणाची वागणूक दिली जाते. ग्रामपंचायतस्तरावर अपंगाच्या संर्वधनासाठी निधी खर्चाची तरतूद आहे. तसा शासनाचा आदेशही आहे. परंतु एकही ग्रामपंचायत अपंगांना याचा लाभ देत नाही. अपंगांची भरती जातनिहाय केली जाते. अनेक अपंगांना दारिद्र्यरेषेचे कार्ड मिळालेले नाही. काहींचे रेशन कार्ड तयार झालेले नाही. यासह अनेक समस्या अपंगांना भेडसावत आहे. मात्र याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. एकटा आमदार बच्चु कडू अपंगांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. वाढीव वेतनही तो नाकारतो आहे. बच्चु कडू ला जमते ते इतर आमदारांना का नाही, हा सवाल यानिमित्ताने निर्माण करण्यात आला आहे. अपंगांसाठी असलेल्या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी) अपंगांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष अपंगांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी सरकारदरबारी पाठपुरवठा केला जात आहे. परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. अपंगांच्या मानधन वाढीची मागणी बऱ्याच वर्षांपासून होत आहे. आमदार स्वत:चे मानधन वाढवितात, परंतु अपंगांकडे दुर्लक्ष करतात. महाराष्ट्राचे हे दुर्दैव असल्याचे मत अपंग संघटनेचे पदाधिकारी हरिश्वर बोबडे यांनी व्यक्त केले.
दिव्यांगांची सहाशे रुपये मानधनावर बोळवण
By admin | Published: August 13, 2016 1:32 AM