शिवसेनेचे पंकज तोडसाम यांच्याविरोधात १५ जुलै रोजी आठपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्याअनुषंगाने २७ जुलै रोजी या ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या चार सदस्यांचा समावेश आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर दुसरा भाजपचा सदस्य अशा सहा सदस्यांच्या सह्या असलेल्या या अविश्वास ठराव प्रस्तावावर या विशेष सभेत मतदान घेतले जाणार आहे. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी सहाही सदस्यांची आवश्यकता आहे. एकही सदस्य जर इकडे तिकडे गेला, तर हा अविश्वास ठराव बारगळू शकतो. सहाही सदस्य अविश्वास ठरावावर ठाम असल्यामुळे एकही सदस्य इकडे तिकडे जाण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे नेते कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. विशेष म्हणजे आठपैकी पाच सदस्य शिवसेनेचे असताना शिवसेनेच्याच सदस्यांनी हा अविश्वास ठराव आणला आहे. हे सदस्य शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले तरी यातील बहुसंख्य सदस्य हे पारवेकर गटाचे आहेत. या अविश्वास ठरावाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद - पंचायत समितीची निवडणूक केवळ सात ते आठ महिन्यांवर आली आहे. असे असताना हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या या अविश्वास ठरावाबाबत संपूर्ण तालुक्यात विविध राजकीय चर्चा रंगत आहेत. २७ तारखेला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स : कुरघोडीचे राजकारण पांढरकवडा तालुक्यात काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे व भाजपचे नेते अण्णासाहेब पारवेकर यांचे परस्परविरोधी दोन गट आहेत. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, तशी भाजपमध्येही आहे. शिवसेनाही गटबाजीत मागे नाही. परंतु सध्या तालुक्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. बाजार समितीच्या सभापतीवर आणलेला अविश्वास ठराव असो, की खरेदी - विक्री संघाच्या अध्यक्षावर आणलेला ठराव असो, आता पंचायत समिती सभापतीवर आणलेला अविश्वास ठराव असो. मोघे यांचा गट व पारवेकर यांचा गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.