लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नवव्या वर्गाचा विद्यार्थी अर्थ विवेक जगताप याने विकसित केलेल्या स्वयंचलित फवारणी रोबोटला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एन्ट्री मिळाली आहे. मोबाईलने कार्यान्वित होत असलेला हा रोबोट अर्थने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तयार केला आहे.पिकांवर कीटकनाशक फवारताना शेतकरी, शेतमजुरांना संकटांना तोंड द्यावे लागते. अनेकांना विषबाधा झाल्याने जीवही गमवावा लागला आहे. काहींची दृष्टी गेली. या बिकट प्रश्नावर उपाय शोधण्याच्या विचाराने पे्ररित होवून त्याने हा रोबोट तयार केला आहे.रोबोट शेतातील पिके स्वत:च आर्द्रता पटलावर दाखवितो. अनेक ठिकाणच्या विज्ञान प्रदर्शनात या प्रयोगाचे कौतुक झाले आहे. नागपूर येथे झालेल्या सीबीएसई विज्ञान प्रदर्शनातही हा रोबोट कौतुकास पात्र ठरला आहे. आता इंडिया बुकऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या प्रयोगाला एन्ट्री मिळाली आहे. तो यवतमाळ येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा नवव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. वडील प्रा. विवेक जगताप यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे.
यवतमाळातील अर्थने तयार केला फवारणी रोबोट; दोन पुस्तकांमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:37 PM