गोर बंजारा साहित्य संघाचे महासचिव मनोहर चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली. जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संघाचे पदाधिकारी सीताराम राठोड, नामा बंजारा, दत्तराम पवार, मनोहर चव्हाण, शहराचे नायक, कारभारी, नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी तरुण मंडळी या सर्वांची बैठक येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साहित्य हे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक चळवळीला खाद्य पुरविण्याचे कार्य करते. सामाजिक मूल्ये बदलतात, त्याप्रमाणे समाज बदलतो. चळवळीला खाद्य मिळाले नाही, तर ती मृतप्राय होते. परिणामी समाज मृतप्राय होतो. महानायक वसंतराव नाईक यांचे कार्य, विचार हे क्रांतिकारक आहेत. परंतु त्यांचे केवळ कृषीविषयक कार्य आपणास काही प्रमाणात अवगत आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक, जलनीती, आरक्षणविषयक क्रांतिकार्य अजूनही समाजापर्यंत पोहोचले नाही. शासन, प्रशासनाकडून त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जयंतीच्या शासकीय कार्यक्रमाला कात्री लावणे सुरू आहे. त्यामुळे वसंत विचारधारा समाजात रुजावी आणि समाजाने या क्रांतिकारी विचाराने प्रेरित होऊन त्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी वसंतवादी साहित्य संमेलन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नामा बंजारा यांनी केले. बैठकीचे संचालन डॉ. उत्तम राठोड, प्रास्ताविक साहित्य संघाचे प्रवक्ते ताराम राठोड यांनी केले. आभार दत्तराम पवार यांनी मानले. यावेळी कारभारी रमेश पवार, बंजारा सेवा संघाचे बाबूसिंग जाधव, दिवाकर राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड, संजय महाराज, डॉ. मनोहर राठोङ, जगदीश राठोड, ज्योतिराम पवार, डॉ. अर्जुन जाधव, अनिल राठोड, नामदेव पवार व समाजबांधव उपस्थित होते.