लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उत्तम शिक्षणतज्ज्ञ व सक्षम प्रशासक अशी सर्वदूर ओळख असलेले आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्यूकेशनचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये सातत्याने अग्रक्रम राखून ठेवल्याचे औचित्य साधून त्यांची ही भेट होती.‘जेडीआयईटी’ला नुकताच ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट इन इंडिया’ हा अवार्ड प्राप्त झाला आहे. महाविद्यालयातील विविध व अद्यावत सोयीसुविधा विचारात घेऊन या अवार्डने सन्मानित केले जाते. यापूर्वी महाविद्यालयाला २०१६ मध्ये एज्यू-रँड यूएसएने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रथम, तर महाराष्ट्रातील पहिल्या दहाच्या यादीत स्थान दिले होते. २०१७ साली आयआरआयएफने (इनोव्हेटर अँड रिसर्चर इंटरनॅशनल फोरम, अमेरिका) ग्रेड-ए तसेच नॅशनल एज्यूकेशन लिडरशीप अवार्डतर्फे वेस्ट झोनमधील ‘आऊटस्टँडिंग इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट’ व ‘बेस्ट इंस्टिट्यूट इन इव्हेंट्स’ असे सन्मान मिळाले आहे. महाविद्यालयात दोन हजारच्यावर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असून एक हजार ५०० च्यावर विद्यार्थ्यांनी आपले औद्योगिक पूर्व प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत ८० टक्केच्यावर उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. दरवर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत या महाविद्यालयाचे विद्यार्थी झळकत आहे. देशविदेशातील नामांकित कंपनीत यशस्वी अभियंते म्हणून सेवा देत आहेत. यावर्षी अंतिम वर्षाच्या २५८ च्यावर विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. संपूर्ण परिक्षेत्रात एका वर्षात सर्वाधिक प्लेसमेंटचा मान या महाविद्यालयाने पटकाविला आहे.अशी गुणवत्ता आणि सोयीसुविधा असलेल्या महाविद्यालयाला डॉ. एस.एस. मंठा यांनी भेट दिली. सर्व विभाग, प्रयोगशाळा, वाचनालय, इंटरनेट सेंटर आदी सोयीसुविधांचे अवलोकन केले. प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. नवनवीन टेक्नॉलॉजीसंदर्भात मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
‘जेडीआयईटी’ला एस.एस. मंठा यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:05 PM