n लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळी संपल्यानंतर गावी परत जाण्यासाठी पाहुण्यांची धावपळ सुरू झाली आहे. तशी प्रवासाकरिता गर्दी नसली तरी सोईसाठी म्हणून जागांचे आरक्षण करून ठेवले जात आहे. यवतमाळ येथून गावी जाण्यासाठी केवळ पुणेकरिताच आरक्षण केले जात आहे. दररोज ३० ते ३५ प्रवाशांचे बुकिंग होत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाने पुणे येथे परतीच्या प्रवासाकरिता आधीच बसेसची व्यवस्था करून ठेवली आहे. दरवर्षी गर्दीचा अनुभव पाहता ही सोय करण्यात आली असली तरी कोरोनामुळे खूप प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते. पुणे येथून यवतमाळला येण्यासाठीही महामंडळाने जादा बसेसची सोय केली होती. यवतमाळसह मार्गात असलेल्या थांब्यावरील प्रवासीही या माध्यमातून एसटीला मिळत आहे. गेली काही महिन्यांपासून एसटीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. दिवाळीची गर्दी कॅश करण्यासाठी यवतमाळ विभागाने बहुतांश मार्गावर आवश्यक तेवढ्या बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. शिवाय ग्रामीण भागातही प्रवासी संख्या वाढल्यास बसफेऱ्या सोडण्यात येत आहे. यासाठी नियोजन केले आहे.
नागपूर, अमरावतीकडे अधिक बसफेऱ्यायवतमाळातून नागपूर आणि अमरावतीकरिता प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवास करणाऱ्यांची यामध्ये भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढू नये याकरिता अधिक बसेस सोडण्याचा प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहिला आहे. अकोला, नांदेडसाठीही अधिक फेऱ्या आहेत.
ग्रामीण नागरिकही रोजगाराच्या ठिकाणी दिवाळीनिमित्त आपल्या गावाकडे आलेले ग्रामीण भागातील नागरिकही रोजगाराच्या ठिकाणी जायला निघाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दीही नेहमीपेक्षा अधिक वाढत आहे. अशावेळी ग्रामीण भागाकरिताही आवश्यक तेवढ्या फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले. कोविडचे नियम पाळून वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे.
खाजगी ट्रॅव्हल्सना मिळत आहे संमिश्र प्रतिसादएसटी महामंडळाच्या लालपरी सोबतच नागरिक खासगी ट्रॅव्हल्सनेही प्रवास करीत आहे. ट्रॅव्हल्सला शासनाने अलिकडेच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ही वाहने आता रस्त्यावर दिसू लागली आहे. यवतमाळ येथून सद्यस्थितीत दहा ते बारा खासगी ट्रॅव्हल्स पुणेसाठी धावत आहे. वैयक्तिक वाहनांना पसंतीएसटी किंवा ट्रॅव्हल्सने प्रवास करणे बहुतांश नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. खासगी वाहनांद्वारे प्रवास करण्याकडे त्यांचा कल आहे. चारचाकी, दुचाकीद्वारे प्रवास करणे सुरक्षित मानले जात आहे. या वाहनांच्या विक्रीतही मागील काही काळात वाढ झाली आहे. एका दुचाकीवर दोन जण प्रवास करीत आहे. गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा खासगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढली आहे.