पुसद/उमरखेड (यवतमाळ) : पुसद येथून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसला शिळोणा घाटात अचानक आग लागली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी टळली.
पुसद आगाराची बस (एम.एच.४०/६१७०) जात असताना वायरिंगच्या शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. चालक अरुण फुके यांनी प्रसंगावधान राखून बसमधील सर्व २१ प्रवाशांना बाहेर काढले. बसचा समोरील भाग पूर्णपणे खाक झाला. पोफाळीचे ठाणेदार राजू हाके ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविली गेली.
विद्यार्थिनीची कागदपत्रे जळाली
बसमधील मंदा दत्ताजी पोटे, रा. जवळी या विद्यार्थिनीची नर्सिंग काॅलेजची सर्व कागदपत्रे तसेच रोख २५ हजार रुपये या आगीत जळाले. भीम सुदसिंग राठोड, रा. पारवा तांडा या प्रवाशाची ५० हजार रुपयांची बॅग व धान्य जळून गेले. सुदैवाने प्राणहानी टळली.