नेर (यवतमाळ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वाहकाने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नेर आगाराच्या आवारात घडला. कोमल मारोतराव चव्हाण (३५), असे या वाहकाचे नाव आहे. त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहे.
नेर आगारात कार्यरत असलेले कोमल चव्हाण रात्री ८ वाजता छत्रपती संभाजीनगर बसफेरी करून परत आले. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी आगारात असलेल्या वॉशिंग मशीनजवळील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावला. दोरीने गळा आवळण्याच्या स्थितीत असताना हा प्रकार आगारात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी या कर्मचाऱ्याला वाचविले.
कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती आगार व्यवस्थापक नीलेश मोकळकर यांना दिली. त्यांनी या वाहकाला तातडीने नेर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. तेथून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती पोलिसांनाही दिल्याचे आगार व्यवस्थापक नीलेश मोकळकर यांनी दिली.