लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक पाैर्णिमेलाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या राज्यभरात मोठी आहे. हे वारकरी एसटीने प्रवास करायचे मात्र, आता एसटी बसच रुसली आहे.
गतवर्षी कोरोनामुळे संपूर्ण एसटी बसेस बंद होत्या. यामुळे अनेकांना पंढरपूरला जाता आले नाही. यावर्षी विठ्ठलाचे दर्शन होईल म्हणून अनेकांनी कार्तिक पाैर्णिमेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता; मात्र गाड्याच नसल्याने विठुरायाचे दर्शन गावातच घ्यावे लागणार आहे. अनेक वारकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. एसटी महामंडळाला या काळात मोठ्या प्रमाणात उत्पन्नही होते. यावर्षी एसटीला दिवाळीच्या आधी उत्सवाच्याही उत्पन्नाला मुकावे लागले आहे.
आषाढी एकादशीला प्रत्येक डेपोतून सहा गाड्या
जिल्ह्यामधून कार्तिक पाैर्णिमेला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या नगन्य असते; मात्र आषाढी एकादशीला जाणाऱ्या एसटी बसेसची संख्या सर्वाधिक असते. या काळात मागणीनुसार गाड्या सोडल्या जातात.
गतवर्षी कोरोनामुळे आषाढीवारी थांबली. यानंतर एसटी बस सुरू झाल्यावर काही वारकरी पंढरपूरला जावून आले; मात्र कोरोनामुळे त्यांना विठुरायाचे दर्शनच घडले नाही. आता तर एसटीच बंद आहे. यामुळे भाविकांना दर्शनाचा मार्ग बंद झाला आहे.
गत २३ वर्षांपासून पंढरीची वारी कधी सोडली नाही. आषाढीला हमखास जातो. कार्तिक महिन्यात काकड आरती असल्याने इथल्याच विठ्ठल मंदिरात दर्शन घेतो. मध्यंतरी पंढरपूरला जाऊन आलो; मात्र दर्शन झाले नाही. वय अधिक असल्याने कोरोनाच्या भीतीत हे दर्शन झाले नाही.
- उमेश सुलभेवार, वारकरी.
पुसदला असताना पंढरपूरला अनेक वेळा जाऊन आलो. आता वय झाले आहे. डोळ्याने दिसत नाही. कोरोनाने जास्तच भीती वाटते. दररोज इथल्या मंदिरात दर्शनासाठी येतो. शेवटी विठ्ठल कणाकणात वसला आहे. अनेकांना कार्तिक पाैर्णिमेला विठ्ठलाचे दर्शन व्हावे म्हणून आशा असते; मात्र एसटीच बंद आहे.
- अशोक येवले, वारकरी
मागणी कुठूनच नाही
एसटीचा संप सुरू असल्याने पूर्ण नियोजन कोलमडले आहे. आषाढीमध्ये एसटी बसेसची मागणी होते. इतर वेळेस पंढरपूरसाठी मागणी नसते. सध्या कुठूनच तशी मागणीही नव्हती. संपामुळे एसटीला कुठल्याच हालचाली करता येत नाहीत. एसटी नेहमीच प्रवाशांच्या सेवेत राहिली आहे.
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ.