लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात अनेक पदांचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. या सर्व प्रकारात नियोजनाचा बोजवारा उडत असतानाच एस.टी.चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रभारी व्यक्ती जीव ओतून जबाबदारी पार पडत नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे. यामुळे कर्मचारीवर्गही त्रस्त झाला असल्याचे सांगितले जाते. महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राळेगाव, वणी याठिकाणी आगार प्रमुख नाही. हे दोनही आगार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. दिवस ढकलण्यापुरता कामगिरी करणारे अधिकारी काही ठिकाणी आहे. बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त आहेत. वरिष्ठांसाठी असलेल्या पदांवर कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी काम करत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक बाजू आणखी दुबळी होत चालली आहे. वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा दणका लालपरीला बसला. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सोयही महामंडळाकडे नव्हती. सरकारने पैसा दिल्यानंतर पगार झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु याविषयात अनेक अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचे दिसून येते. काही आगारातून अनेक बसफेऱ्या रद्द होतात. अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरात एकाच मार्गावर चार ते पाच बसेस धावतात. आठ-दहा प्रवासी घेऊन आगारातून निघालेल्या या बसेसला शेवटच्या थांब्यापर्यंतही पूर्ण प्रवासी मिळत नाही. यात नियोजनाचा अभाव दिसून येतो.